मुंबई : 'पान सिंह तोमर', 'मकबूल', 'पिकू', 'कारवाँ', 'मदारी' अशा अफलातून चित्रपटांतून अभिनेता इरफान खान जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले, तेव्हा प्रत्येक वेळी ते नव्याने काय घेऊन आले आहेत, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. प्रत्येक पात्रासह इरफान वेळोवेळी काहीतरी सांगून जात होते. बरं त्यांनी साकारलेल्या भूमिकांची ताकदही इतकी की त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा झाल्यावाचून राहत नसे. अतिशय वेगळ्या अशा वाटेवरुन अभिनयाच्या या विश्वात आपली ओळख निर्माण करणारा हा अभिनेता, म्हणजेच काही औरच.
कर्करोगाच्या आजाराशी झुंज देणारा जीवनाशी खऱ्या अर्थाने दोन हात करणारे हे लढवैय्ये इरफान आज आपल्यात नाहीत. पण, त्यांचं अस्तित्वं मात्र कायम सर्वांमध्येच राहणार आहे.
चेहऱ्यावर निरागस भाव असणारा 'बिल्लू' असो किंवा, 'पिकू' आणि 'कारवाँ' या चित्रपटांमध्ये वाहनाच्या चालकाच्या आसनावर बसून एका अद्वितीय सफरीवर नेणारे इरफान असो. ते सातत्याने शिकवून जात होते. अशा या अभिनेत्याचे उदगार, त्याचे काही दृष्टीकोन म्हणजे जणू एका रहस्यमय आणि तितक्याच जादुई विश्वाची सफर. चला तर मग, अशाच .काही उदगारांच्या माध्यमातून डोकावूया इरफान खान यांच्या भावविश्वात....
*'इज्जत और जिल्लत आपके हाथ मे नही है'
*लोकांना माझा चेहरा नव्हे, माझं काम पाहायला आवडतं.
*चित्रपट अभिनेता किंवा क्रिकेटपटू युवा पिढीचा आदर्श असतो तेव्हा मला चीड येते. मी त्यांच्या विरोधात नाही. ते अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांचं मनोरंजन करतात. समाजास उपयोगी पडतात. इतरांच्या जीवनात योगदानही देतात. पण, ते खरे 'हिरो' नाहीत.
*प्रसिद्धीची आस करणं हा रोग आहे आणि एके दिवशी मी या रोगापासून मुक्त झालेलो असेन. जिथे प्रसिद्धीची काही किंमत नसेल, जिथे आयुष्याचा अनुभव घेणं आणि त्यातच समाधानी असणं पुरेसं असेल.
*मी एकदा मोठ्या संकटातून जात होतो. तेव्हा मी त्यावर उपचार घेतले कारण, मला ते सारं असह्य होत होतं. भारतात उपचार हा काही संस्कृतीचा भाग नाही. किंबहुना इथे अद्याप त्याची फारशी गरजच भासत नसल्याचं दिसतं.
*जिथे कलागुणांचा, कौशल्याचा आदर केला जातो तेच एका चांगल्या समाजाचं प्रतीक असतं.
*तुम्ही तारुण्यावस्थेत असता तेव्हा बऱ्याच गोष्टींविषयी तुम्हाला कुतूहल असतं. त्यातीच काही गोष्टी टीकतात, काही नाहीशा होतात. मी कोणत्याही गोष्टीशिवाय तग धरु शकेन. पण, निसर्गाशिवाय नाही....
*जेव्हा मी पारंपरिकतेकडे झुकेन तेव्हा माझ्यातील कशाचातरी अंत होत असेल.
पाहा : #IrrfanKhan : अभिनयातला 'साहबजादा' हरपला....
अतिशय सोप्या पण, तितक्याच व्यापक संकल्पनांसह रुपेरी पडद्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या या अभिनेत्याला 'झी २४तास'कडून भावपूर्ण श्रद्धांजली.