मुंबई : समांतर चित्रपट अर्थात पॅरेलल सिनेमा या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सध्या एक वक्तव्य करत सर्वांचच लक्ष वेधलं आहे. चौकटीबाहेरील चित्रपट आणि कथानकांना प्राधान्य देणाऱ्या पालेकर यांनी ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या बुलंदशहर हिंसेप्रकरणीच्या विधानाविषयी आपले विचार मांडले आहेत.
कोणत्याही मुद्द्यावर व्यक्त होण्यापूर्वी आणि सकारात्मक, नकारात्मक अशा कोणत्याही प्रकारच्या निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी वेगळ्या दृष्टीकोनानेही गोष्टींकडे पाहावं, असं ते म्हणाले.
समाजातील सद्यस्थिती पाहता असहिष्णुतेचा वाढता प्रभाव लक्षात घेत घडणाऱ्या सर्व घटनांचा सारासार विचार करुन त्यानंतरच वक्तव्य करावं किंवा निष्कर्षावर पोहोचावं, असं म्हणत पालेकर यांनी काही पटण्याजोगी उदाहरणं दिली. थेट नकारात्मक प्रतिक्रिया देण्याऐवजी समंजस व्यक्तींनी आपलं मत मांडावं जे सकारात्मक नसेल तरीही त्यावर नकारात्मकतेचीही सावली नसेल.
या समजंस वर्गात नेमका कोणाचा समावेश होतो, याचं विश्लेषण करत पालेकर म्हणाले, "इथे उदाहरण अशा व्यक्तींचं घेता येतं जे नसिरुद्दीन शाह यांच्या विचारांशी सहमत नसतील. पण, एक अभिनेता म्हणून मात्र त्यांचं नसीर यांच्याप्रती असणारं प्रेम मात्र कायम राहील. येशू ख्रिस्त आणि अल्लाहची गाणी न गाण्याची टी.एम कृष्णाची कल्पना आवडत नसली तरीही त्याचा कॉन्सर्ट रद्द झाल्यावर हीच मंडळी चक्क आंदोलनं करतात. 'पद्मावत' हा या चित्रपटातून इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आसल्याचं म्हणत त्याचा विरोध करत असले तरीही एक कलाकृती म्हणून त्याची दादही देतात. खान आडनाव आहे म्हणून महाभारतात काम करणाऱ्या आमिरची खिल्ली उडवत नाहीत."
अतिशय समर्पक उदाहरणं देत समाजातील एका अशा वर्गाचा दृष्टीकोन यावेळी पालेकर यांनी सर्वांसमोर ठेवत त्यांची मतंही तितकीच महत्त्वाची असल्याची बाब अधोरेखित केली. आशय़ क्लबने आयोजित केलेल्या ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवात झेनिथ आशिया पुरस्काराचा स्वीकार करत आपल्या आभारप्रदर्शनपर भाषणात त्यांनी हे विचार मांडले.