रणवीर सिंगला नाही आवरले अश्रू; चारचौघांत काय केलं पाहा...

भावनांना आवरणं अशक्य झालं होतं. 

Updated: Oct 19, 2021, 11:05 AM IST
रणवीर सिंगला नाही आवरले अश्रू; चारचौघांत काय केलं पाहा...
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग यानं नुकतंच The Big Picture या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे. पण ही नवी इनिंग त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. कार्यक्रमाच्या नुकत्याच चित्रीत करण्यात आलेल्या भागात रणवीरपुढे अशीच अडचण आली, जिथे त्याच्या भावनांना आवरणं अशक्य झालं होतं. अखेर बी- टाऊनचा हा हरहुन्नरी कलाकार व्यासपीठावरच रडू लागला. 

अभय सिंह नावाच्या सहभागी स्पर्धकाच्या संघर्षाची आणि त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगराची हकिगत ऐकून रणवीरला रहावलं नाही. दाटून आलेल्या त्याच्या सर्व भावना अश्रूंवाटे बाहेर पडल्या. 

'मी सातवी इयत्तेत असतानाच वडिलांचं निधन झालं. तव्हा नेमकं काय होत होतं, याचाच मला अंदाज येत नव्हता कारण मी फारच लहान होतो. त्या क्षणापर्यंत मी मरण काय असतं हे पाहिलंच नव्हतं. मी माझ्या कुटुंबासमोर रडलोच नव्हते आणि मी रडलो जरी असेन तरी कोणाला ते कळलंच नसावं. माझ्या आईने आम्हा सर्वांसाठी फारच मेहनत घेतली. आमच्याकडे इतकेही पैसे नव्हते की सर्व भावंड़ शाळेत जाऊ शकू', असं अभय रणवीरला सांगताना दिसला. 

समोरच्या व्यक्तीकडून सांगण्यात येणाऱ्या या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर रणवीरनं त्याच्या भावनांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण, अखेर त्याला हे सारं अशक्य झालं आणि रडू कोसळलं. 

कायमच धमाल मस्ती करणारा रणवीर, किती भवनिक आहे हेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमो व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. आपल्या आवडीच्या अभिनेत्याला असं रडताना पाहून चाहत्यांच्या भावनाही कमेंट्सच्या माध्यमातून अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.