राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेणार रितेश- जेनेलिया

काही खास गोष्टींचा उलगडा होणार... 

Updated: Feb 13, 2020, 09:20 AM IST
राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेणार रितेश- जेनेलिया  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कित्येक वर्षांपासून हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर रितेश देशमुखने आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. असा हा अभिनेता आता त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हिच्यासोबत एका वेगळ्या अंदाजात सर्वांसमोर येणार आहे. यावेळी कोणा एका चित्रपटाचं किंवा त्यांच्या आगामी प्रोजेक्टचं निमित्त नाही. 

१४ फेब्रुवारी य़ा दिलशी रितेश आणि जेनेलिया महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रभावी व्यक्तीमत्त्वाची मुलाखत घेणार आहेत. राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या या व्यक्तीसोबत त्यांची पत्नीसुद्धा मुलाखतीत सहभागी होणार आहे. रितेश आणि जेनेलियाच्या प्रश्नांना सामना आता नेमका कोणाला करावा लागणार, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

तर, एकेकाळी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण एका खास कार्यक्रमात रितेश आणि जेनेलियाच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे प्रश्नोत्तराचं सत्र आणि हा गप्पांचा फड रंगणार आहे. नांदेडमध्येच हा कार्यक्रम पार पडणार असल्याचं कळत आहे. 

Oscars 2020 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी 

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. शंकरराव चव्हाण वैयक्तिक जीवनात नेमके कसे होते? त्यांच्याकडून आपल्याला कोणती शिकवण मिळाली या आणि अशा कैक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीतून समोर येणार आहेत. या प्रश्नांशिवाय रितेश त्याच्या कोणत्या अफलातून प्रश्नांची फिरकी अशोक चव्हाणांसमोर टाकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.