सलमानसाठी काहीपण! चाहत्याचा 'सायकल'नामा पाहून भाईजानही होईल थक्क

फक्त सलमानला भेटण्यासाठी... 

Updated: Feb 14, 2020, 12:39 PM IST
सलमानसाठी काहीपण! चाहत्याचा 'सायकल'नामा पाहून भाईजानही होईल थक्क
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : कलाकारांच्या लोकप्रियतेचा अंदाज हा चाहत्यांचं त्यांच्यावर असणारं प्रेम पाहून लगेचच लक्षात येतो. लोकप्रियतेच्या या निकषांच्या बाबतील काही कलाकार मंडली मात्र साचेबद्ध व्याख्यांच्या पलीकडे असतात. अशाच अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे सलमान खान. वांद्रे येथील त्याचं घर म्हणू नका, चित्रपटाचा सेट म्हणू नका किंवा मग सोशल मीडिया म्हणू नका. भाईजानच्या लोकप्रियतेला शब्दांत व्यक्त करणं तसं कठीणच. 

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धीझोतात असणाऱ्या याच सलमानसाठी त्याच्या एका चाहत्याने भन्नाट शक्कल लढवल त्याची भेट घेण्यासाठी एक मोठा प्रवास केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या चाहत्याची दखल घेत त्याविषयी माहितीही दिली आहे. 

मूळच्या आसाम येथील असणाऱ्या या चाहत्याचं नाव आहे, भुपेन लिक्सन. तिन्सुकीया येथून त्यांनी सुरु केलेला हा प्रवास गुरुवारी गुवाहाटी येथे येऊन थांबला. फक्त सलमानची एकदा भेट घेण्यासाठी म्हणून भूपेन ६०० किलोमीटरचा प्रवास करुन आले. तेसुद्धा त्यांच्या सायकलवर. त्यामुळे त्यांचा हा सायकलनामा, सलमानसोबत त्यांची भेट घडवून आणणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

आपल्या या अनोख्या प्रवासाविषयी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना भूपेन म्हणाले, 'मी तिन्सुकीया येथील जगूनमधून ८ फेब्रुवारीला हा प्रवास सुरु केला. सलमान फिल्मफेअर पुरस्कारांसाठी गुवाहाटी येथे येणार आहे. त्याची भेट घेण्यासाठीच मी इथे आलो आहे.'

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

वयाची पन्नाशी उलटूनही आपल्या आवडत्याअभिनेत्यासाठी भूपेन यांचा हा प्रवास सध्या त्यांना खऱ्या अर्थाने सलमानचा जबरा फॅन ठरवत आहे. मुख्य म्हणजे भूपेन हे त्यांच्या सायकलस्वारीसाठीसुद्धा ओळखले जातात. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये त्यांच्या नावे ६० मिनिटांमध्ये ४८ किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालवण्याचा विक्रम आहे. बरं हा विक्रम यासाठी, की त्यांनी सायकलच्या हँडलला स्पर्शही न करता ही सायकल चालवली होती.