अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Updated: Aug 11, 2020, 11:13 PM IST
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण

मुंबई: बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा यांनी मंगळवारी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदा झाले आहे. त्याची प्रकृती वेगाने सुधरावी यासाठी आपण प्रार्थना करुयात, असे नाहाटा यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. मात्र, त्याचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. आवश्यक उपचारानंतर संजय दत्तला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.

यानंतर आज संजय दत्त याने ट्विट केले होते. यामध्ये त्याने म्हटले होते की, मित्रांनो काही वैद्यकीय उपचारांसाठी सध्या मी नेहमीच्या कामातून लहानशी सुट्टी घेत आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमचे प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन, असे संजय दत्तने या ट्विटमध्ये म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहे.