मुंबई : बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेल्यानंतर एके दिवशी अभिनेता शाहिद कपूर याने चाहत्यांना धक्काच दिला. मीरा राजपूत या मुलीशी लग्नगाठ बांधत शाहिदने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करत शाहिद आदर्श पती ठरला. सहजीवनाच्या चार वर्षांच्या या प्रवासात त्याला मीराची पावलोपावली साथ होती. कारकिर्दीतील यशापासून ते अगदी आयुष्यात येणाऱ्या अडचणींपर्यंत प्रत्येक वेळी शाहिदला मीराची साथ मिळाली.
सेलिब्रिटी वर्तुळात ही जोडी खऱ्या अर्थाने सर्वांच्याचा मनाचा ठाव घेऊन गेली. याच नात्याविषयी आता शाहिदने एक महत्त्वाची बाब सर्वांच्या समोर आणली आहे. 'वोग'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याविषयी वक्तव्य केलं. मीराला पहिल्यांदा भेटण्यापासून ते अगदी तिच्यासोबतच्या नात्यापर्यंत सर्वत बाबतीत त्याने मनमोकळा संवाद साधला.
चार वर्षे मीराची साथ लाभलेल्या शाहिदला पहिल्या भेटीत आपण या मुलीसोबत पंधरा मिनिटांचा वेळ तरी व्यतीत करु का, असाच प्रश्न पडत होता. तिच्यासोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगताना शाहिद म्हणाला, 'माझ्या डोक्यात एकच विचार सुरु होता. एका खोलीमध्ये दोन मोठमोठ्या सोफ्यांवर आम्ही दोघंच बसलो होतो. त्यावेळी एकच विचार मनात येत होता, आम्ही किमान पंधरा मिनिटं तरी एकत्र राहणार आहोत का?'. शाहिदच्या डोक्यात येणारे विचार आणि मीरासोबतची त्याची जन्मभराची साथ पाहता खरंच काही नाती ही विधीलिखितच असतात हेच खरं.
शाहिदच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत मीराने ते दोघंही एकाच क्षेत्रातील नसणं ही चांगली बाब असल्याचं स्पष्ट केलं. 'उडता पंजाब' चित्रपटात एका विक्षिप्त व्यक्तीरेखेला म्हणजे 'टॉमी सिंग' या पात्राला न्याय देणाऱ्या शाहिदने या भूमिकेसाठी मीराचा पाठिंबा मिळाला होता, सोबतच ती या पात्राची समीक्षकही होती, असं तो म्हणाला. याविषयीच्या तिच्या प्रतिक्रियेविषयी सांगताना तो म्हणाला, ''आम्ही सोफ्यावर एकत्र बसलो होतो, त्यातच मध्ये ती (मीरा) सोफ्याच्या कोपऱ्यावर जवळपास पाच फूट दूर झाली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तू असा नाही आहेस ना? या पात्राप्रमाणे कुणीही व्यक्ती तुझ्यात दडलेली नाही ना? मला आताच सांग, मी निघून जाईन.''
'वोग'ला दिलेल्या या मुलाखतीत शाहिद आणि मीरा या दोघांनीही त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवली. त्यांच्या नात्यातील विश्वास आणि एकमेकांप्रती असणारा आदर पाहता, एकंदरच ही सेलिब्रिटी जोडी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही.