रणबीरसोबतच्या नात्य़ाविषयी आलियाचं भावूक वक्तव्य

दृष्ट न लागो म्हणत..... 

Updated: Jun 25, 2019, 10:22 AM IST
रणबीरसोबतच्या नात्य़ाविषयी आलियाचं भावूक वक्तव्य

मुंबई : तो समजण्यासाठी कठीण माणूस नाही आहे.... तर तो खरंच एखाद्या मौल्यवान रत्नाप्रमाणे आहे..., असं म्हणत अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आणि रणबीर कपूरच्या नात्याची व्याख्या मांडते. आगामी चित्रपटांच्या व्यापात अतिशय व्यग्र असणाऱी आलिया तिच्या खासगी आयुष्यालाही तितकंच प्राधान्य देते. परिणामी अभिनेता रणबीर कपूरसोबतचं तिचं नातं हे कायमच कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. 

आलियाने 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत नुकत्याच या सुरेख नात्याचा उलगडा केला. हे रिलेशनशिप म्हणजे मैत्रीचं एक सुखावणारं सुरेख असं नातं असल्याचं तिने सांगितलं. 'सध्याच्या घडीला मी भाळात अक्षरश: ताऱ्यांवरच चालत असल्याची भावना येत आहे. आम्हा दोघांच्याही करिअरचा चांगला टप्पा सध्या सुरु आहे. तो सलग चित्रीकरणात व्यग्र आहे आणि मीसुद्धा. तुम्ही किती वेळ एकमेकांसोबत असता हा मुद्दाच इथे उपस्थित होत नाही. कारण इथे नात्यातील सहजपणा जास्त महत्त्वाचा असतो. खरंच या साऱ्याला कोणाचीही दृष्ट न लागो', असं आलिया म्हणाली. 

रणबीरच्या कठोर वागण्याच्या बऱ्याच चर्चा अनेकदा कानांवर येतात. पण, तसं नसून 'तो समजण्या- उमगण्यासाठी अशक्य व्यक्ती नाही. तर, तो एखाद्या रत्नाप्रमाणेच आहे', ही बाब आलियाने अधोरेखित केली. 

रणबीरचाही भूतकाळ होता. प्रत्येकाचाच असतो. पण, या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही असं म्हणत आपण काही कमी नाही असं ती मोठ्या विनोदी अंदाजात म्हणाली. रणबीर एक अभिनेता म्हणून सर्वोत्तम आहे, एक व्यक्ती म्हणूनही तो अतिशय चांगला आहे. किंबहुना सर्वच बाबतीत तो आपल्याहून श्रेष्ठ असल्याचं आलियाने सांगितलं. 

रणबीरसोबतच्या नात्याविषयी अतिशय मोकळेपणाने आणि तितक्याच महत्त्वाच्या भावनांना वाट मोकळी करुन देत आलियाने यावेळी एका गोष्टीलिषयीची खंतही सर्वांसमोर ठेवली. रोज सकाळी उठल्यावर कानावर येणाऱ्या लग्नाच्या चर्चा अनेकदा पसंतीस उतरत नसल्याचं तिने म्हटलं. सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून रणबीर आणि आलियाच्या जोडीकडे पाहिलं जातं. येत्या काळात ही जोडी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.