'त्या' अभिनेत्रीशी तुलना होण्याबाबत दीपिका म्हणाली...

Chhapaakचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर... 

Updated: Dec 24, 2019, 10:12 AM IST
'त्या' अभिनेत्रीशी तुलना होण्याबाबत दीपिका म्हणाली...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री Deepika Padukone दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिका असणारा 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. असं असताना या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दीपिका, दिग्दर्शिका मेघना गुलजार विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. मुलाखतींच्या सत्रांमध्येही त्यांची हजेरी पाहायला मिळत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान दीपिकाला तिच्या 'छपाक'मधील भूमिकेची 'उयरे' या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती हिने साकारलेल्या भूमिकेशी तुलना होत असल्याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरच दीपिकाने तिची प्रतिक्रिया दिली. 

Chhapaakचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनीच त्याची तुलना 'उयरे' या चित्रपटाशी करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये अभिनेत्री पार्वती हिने एका ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका साकारली होती. आपल्या आगामी चित्रपटाची तुलना होण्याविषयी आता दीपिकाने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. राजीव मसंद यांच्यासोबतच्या मुलाखतीत तिने हा मुद्दा पुढे केला. 

अशा मुद्द्यावर चित्रपट साकारलं जाणं ही स्वीकारार्ह बाब आहे ज्यावर इतरही चित्रपट साकारत आहेत, असं तिने सांगितलं. 'प्रत्येकाचा हे मुद्दे मांडण्यासाठीचा मार्ग वेगळा असतो. पद्धत वेगळी असते. आज कोणी दुसरंही लक्ष्मी किंवा ऍसिड हल्ला पीडितेच्या जीवनावर आधारित चित्रपट साकारण्याचा निर्णय घेईल. माझ्यामते प्रत्येक चित्रपटाचा वेगळा परिणाम असेल. जी अर्थातच एक चांगली बाब आहे. कारण, चित्रपट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे ज्यातून आम्ही काही गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो', असं दीपिका म्हणाली. 

Chhapaak : दीपिकाआधी 'या' अभिनेत्रीने साकारलेली ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका

भारतात यापूर्वी ऍसिड हल्ले होत नव्हते असं नाही, असं सांगत शबाना आझमी यांनीही या मुद्द्यावर चित्रपट साकारल्याची बाब लक्षात आणत अशा गोष्टी आपल्याला सतावत नसल्याचा मुद्दा तिने अधोरेखित केला. एक अभिनेत्री म्हणून स्वत:च्या कलेवर विश्वास ठेवण्यासोबतच आपल्यापूर्वी आणि आपल्यानंतर अशा कलाकृती साकारणाऱ्यांप्रतीसुद्धा तिने अतिशय आदराची भावनाच व्यक्त केली.