मुंबई : 'बेबो', 'बेगमजान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री करीना कपूर खान हिने नेहमीच विविध विषयांवर तिची ठाम भूमिका मांडली आहे. एखाद्या कलाकाराला पाठिंबा देणं असो किंवा मग पतीच्या पूर्वायुष्याविषयी वक्तव्य करणं असो. करीनाने नेहमीच या सर्व गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं आहे.
सध्या बी- टाऊनची ही 'बेगम' चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या एका मुलाखतीमुळे. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत तिने #MeToo विषयी वक्तव्य केलं आणि सोबतच सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसोबत असणाऱ्या तिच्या नात्याविषयीही तिने सूचक वक्तव्य केलं.
करीनाला 'छोटी माँ म्हणून संबोधलं तर तिला धक्काच बसेल असं वक्तव्य सैफची मुलगी सारा अली खान हिने 'कॉफी विथ करण' या चॅटशोमध्ये केलं होतं. त्याचा संदर्भ देत करीनाने सारा आणि इब्राहिमसोबत असणाऱ्या नात्याविषयी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं.
'मी नेहमीच त्यांच्या भल्याची कामना करते. किंबहुना मी ही गोष्ट सैफलाही सांगितली आहे की, सारा आणि इब्राहिमची मी खूप चांगली मैत्रीण होऊ शकते. मी त्यांची आई कधीच होऊ शकत नाही. कारण, त्यांच्याकडे खूप चांगली आई आहे. जिच्या संस्कारात ते मोठे झाले आहेत. त्यामुळे मी त्यांची मैत्रीणच आहे. कधीही कोणत्याही वळणावर त्यांना गरज भासल्यास, आधार लागल्यास मी आहेच', असं ती म्हणाली.
करीनाचं हे वक्तव्य आणि सारा, इब्राहिमसोबत असणारं तिचं नातं पाहता कोणतीही कटुता न ठेवता त्यांनी या नात्यांचा अगदी सुरेख आणि सकारात्मक पद्धतीने स्वीकार केल्याचं कळत आहे.