'लो चली मै...', म्हणत रेणुका- माधुरी पुन्हा ठेका धरतात तेव्हा

पाहा खुद्द माधुरीनंच शेअर केला हा  throwback video

Updated: Oct 7, 2020, 05:31 PM IST
'लो चली मै...', म्हणत रेणुका- माधुरी पुन्हा ठेका धरतात तेव्हा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नव्वदच्या दशकामध्ये काही गाजलेल्या चित्रपटांचा उल्लेख केला की अनेकांना काही चित्रपटांची नावं हमखास आठवतात. त्यातील गाणी, कलाकार, कथानक अगदी डायलॉगही. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, सलमान खान, मोनीष बहल यांच्या आणि इतरही प्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका असणारा 'हम आपके है कौन'. 

आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या या चित्रपटातील एका गाण्यावर अनेक वर्षांनी ठेका धरतानाचा व्हिडिओ खुद्द माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. निमित्त आहे ते म्हणजे रेणुका शहाणे यांच्या वाढदिवसाचं. ऑनस्क्रीन मोठ्या बहीणीच्या वाढदिवसानिमित्तानं माधुरीनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्या 'दोघी लो चली मै...' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. 

कशातीही तमा न बाळगता, गाण्याच्या आणि त्या क्षणाचा मनमुराद आनंद लुटत रेणुका आणि माधुरीनं धरलेला ठेका पाहून चाहत्यांच्याही चेहऱ्यावर स्मित आल्याशिवाय राहत नाही. या throwback video सह माधुरीनं रेणुकाला शुभेच्छा दिल्या. ऑनस्क्रीन बहिणींच्या भूमिकेत झळकून लोकप्रियता मिळवणाऱ्या या दोन्ही अभिनेत्रींना बऱ्याच वर्षांनी असं एकत्र पाहून यावेळी चाहत्यांमध्ये आनंदाचीच लाट पाहायला मिळाली. 

 

'आपल्या एकत्र अशा अनेक आठवणी आहेत. हम आपके है कौन पासून अगदी बकेट लिस्टपर्यंत. तुझ्यासोबत वेळ व्यतीत करणं कायमच आनंद देणारं असतं. तुला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा....', असं तिनं व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं. माधुरीच्या या शुभेच्छा पाहून रेणुका यांनीही तिचे ऑनलाईनच आभार मानले. शिवाय येत्या काळात अनेक आठवणी साकारू अशी आशाही त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.