रुपेरी पडद्यापासून दूर जात माधुरी करणार 'हे' काम

काय आहे हे गौडबंगाल? 

Updated: Mar 11, 2020, 04:35 PM IST
रुपेरी पडद्यापासून दूर जात माधुरी करणार 'हे' काम
माधुरी दीक्षित

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित अखेर रुपेरी पडद्यापासून दूर येऊन एका नव्या वळणावर पोहोचली आहे. चित्रपट, रिऍलिटी शोचं परीक्षकपद आणि इतरही काही जबाबदारीच्या भूमिकांमधून झळकलेली ही अभिनेत्री एका नव्या आणि तितक्याच नवख्या विश्वात येत आहे. मुख्य म्हणजे यासाठी ती मोठ्या, रुपेरी पडद्यापासून काहीशी दूर जात आहे. 

माधुरीसाठी हे विश्व नवं असण्याचं कारण म्हणजे, चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिसपलीकडली दुनिया तिच्यासाठी सज्ज आहे. इथला प्रेक्षकवर्गही तिच्यासाठी नवा असेल आणि कार्यक्रमांच्या संकल्पनाही. कारण, हृदयाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री आता वेब विश्वाकडे वळली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी तिने अखेर हिरवा सिग्नल  दिला आहे.

लवकरच ती नेटफ्लिक्सच्या एका वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनकडून या शोची निर्मीती केली जाणार आहे. यापूर्वीही माधुरीने पहिल्या मराठी सिनेमाचं अर्थातच बकेट लिस्टची निर्मीती करण जोहरनंच केली होती.

फॅमिली ड्रामा आणि सुपरहिरोवर आधारित माधुरीची ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर अर्थात गूढकथा आणि थराराच्या पार्शभूमीवर बेतलेली आहे. अद्यापही या वेबसिरीजध्ये माधुरीची भूमिका काय असेल या विषयी गोपनियता पाळण्यात आली आहे. शिवाय याचबरोबर वेबसिरीजचं नाव आणि कास्टही अजून गुलदस्त्यातच आहे.

शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

मनोरंजन जगतात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. तेव्हा आता नेटफ्लिक्सप्रेमींसाठी आणखी एका दमदार सीरिजचा नजराणा साकारला जाणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.