सलमान खानच्या 'दबंग ३'विषयी मलायकाचा महत्त्वाचा खुलासा

खान कुटुंबाशी तिचं नातं जोडलं गेलं होतं. पण.... 

Updated: Jul 18, 2019, 12:00 PM IST
सलमान खानच्या 'दबंग ३'विषयी मलायकाचा महत्त्वाचा खुलासा  title=

मुंबई : अभिनेत्री, मॉडेल आणि निर्माती म्हणून हिंदी कलाविश्वात नावारुपास आलेली मलायका अरोरा ही आणखी एका कारणामुळेही ओळखली जात होती. हिंदी कलाविश्वातील काही प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक अशा खान कुटुंबाशी तिचं नातं जोडलं गेलं होतं. पण कालांतराने त्या नात्यात दुरावा आल्यामुळे मलायका आता खान कुटुंबीयांपासून सहसा दूर राहण्याला प्राधान्य देत असल्याचं कळत आहे. 

अरबाज खानची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका हिने सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'दबंग' या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हातभार लावला होता. शिवाय याच चित्रपटात तिने 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर एन अफलातून नृत्यही सादर केलं होतं. पहिल्या चित्रपटामागोमाग दबंगच्या दुसऱ्या भागातही मलायकाने निर्मितीसाठी हातभार लावला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात तिची काय भूमिका असेल, असाच  प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. ज्याचं उत्तर खुद्द मलायकाकडूनच देण्यात आलं आहे. 

प्रभुदेवा दिग्दर्शित 'दबंग ३' या चित्रपटाच्या निमित्ताने, 'तू या चित्रपटाच्याही निर्मितीत हातभार लावत आहेस का?' असा प्रश्न तिला विचारण्यात आला. ज्या प्रश्नाचं उत्तर देत तिने एक महत्त्वाचा खुलासा केला. 

'नाही..... मी या चित्रपटाचा भाग नाही. या चित्रपटाशी जोडले गेलेले सर्वजण फार पुढे गेले आहेत. त्यामुळे मी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ इच्छिते....', असं मलायका म्हणाली. 'दबंग ३'पासून दूर असली तरीही, मलायका निर्मिती क्षेत्रापासून मात्र दुरावलेली नाही. येत्या काळात आपण प्रेक्षकांसाठी काही चांगल्या कथांनकं भेटीला आणणू इच्छितो असं तिने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. शिवाय सध्याचा काळ हा आपल्या आयुष्यातील अतिशय सुरेख काळ असल्याचंही ती म्हणाली.