मिथिला पालकरवर दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन

सर्वस्वी महत्त्वाच्या स्थानी असणाऱ्या व्यक्तीच्या निधनामुळं ती पुरती कोलमडून गेली आहे.   

Updated: Mar 31, 2022, 10:37 AM IST
मिथिला पालकरवर दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सतत हसऱ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांसमोर येणारी, आपल्या निरागसतेनं सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत आव्हानात्मक दिवासांना सामोरी जात आहे. मिथिलाच्या आयुष्यातून तिच्यासाठी सर्वस्वी महत्त्वाच्या स्थानी असणाऱ्या व्यक्तीच्या निधनामुळं ती पुरती कोलमडून गेली आहे. (mithila palkar )

आपल्याला घडताना पाहणाऱ्या या व्यक्तीचं निघून जाणं पचवणं तिलाही कठीण झालं आहे. पण, कसंबसं तीसुद्धा परिस्थिती स्वीकारताना दिसत आहे. 

मिथिलाच्या आयुष्यातून एक्झिट घेणारी ही व्यक्ती म्हणजे तिचे आजोबा. ज्यांना ती प्रेमानं भाऊ असं म्हणत होती, अशा मिथिलाच्या आजोबांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

26 मार्च रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ज्यानंतर आता काही दिवसांनीच मिथिलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट लिहित आपल्या आयुष्यातील या पहिल्या प्रेमाला अलविदा म्हटलं. 

'माझ्या विश्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आणि मला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी असणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वीच आपल्याला सोडून गेले. 

त्यांच्याशिवाय असणारं आयुष्य मला ठाऊक नाही, कळणारही नाही. मला इतकंच ठाऊक आहे, की ते एक लढवय्ये होते. त्यांची आयुष्य जगण्याची उमेदच आता आपण साजरा करणार आहोत. 

ते माझ्यासाठी खास होते आणि कायम अग्रस्थानीच राहतील. खूप छान राहा भाऊ. आता स्वर्गातही आनंदी वातावरण असेल... तुमच्या त्या हसण्यामुळं... '    

मिथिलानं ही पोस्ट लिहिताच अनेक कलाकार मित्र आणि फॉलोअर्सनी तिला आधार दिला. 

दरम्यान, मिथिला बरीच वर्षे तिच्या आजी- आजोबांसोबत मुंबईतील दादर येथे वास्तव्यास होती. ज्यामुळं या दोघांशीही तिचं खास नातं होतं. आताही अनेकदा ती तिच्या दादरमधील घरातून आजी- आजोबांची झलक सर्वांच्या भेटीला आणताना दिसली. 

नात आणि आजी-आजोबांचं हे नातं सर्वांनाच हेवा वाटेल असं होतं आणि यापुढेही राहील यात शंका नाही.