या वयात बिग बींसाठी आलंय लग्नाचं प्रपोजल, काय असेल त्यांचं उत्तर ?

क्या बात है..... 

Updated: Oct 1, 2021, 02:07 PM IST
या वयात बिग बींसाठी आलंय लग्नाचं प्रपोजल, काय असेल त्यांचं उत्तर ? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनयाच्या बळावर मागील कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी इतके मैलाचे दगड प्रस्थापिक केले आहेत जे मोजणंही कठीण. रुपेरी पडद्यावर हा चेहरा झळकला आणि त्यांच्या भारदस्त आवाजात एखादा डायलॉग कानी पडला, की पाहता पाहता टाळ्यांचा कडकडाट झालाच म्हणून समजा. कोणत्याही वयातील तरुणीला अमिताभ बच्चन यांचा रुबाब भावतो. अशाच एकिनं त्यांना वयाच्या जवळपास 78 व्या वर्षात थेट लग्नाचं प्रपोजल दिलं आहे. 

ही तरुणी, किंबहुना ही अभिनेत्री आहे समीरा रेड्डी. समीरानं या महानायकापुढे ठेवलेल्या या प्रस्तावाला आता ते नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण, या साऱ्याआधी एक बाब स्पष्ट होणं तितकंच गरजेचं आहे. ही बाब म्हणजे त्या प्रपोजलची गोष्ट. 

अॅमेझॉन अॅलेक्सानं पहिलंवहिलं भारतीय सेलिब्रिटी वॉईस फिचर बाजारात आणलं आहे. ज्यामुळं आता युजर्सना खुद्द बिग बी बच्चन यांच्याच आवाजात उत्तर मिळणार आहे. याच प्रोडक्टला समीरानं तिच्या अंदाजात प्रमोट केलं आहे. 

आपण बच्चन यांच्यासोबत डेटवर जात असल्याचं समीरानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ते कसे आहेत, त्यांचं आवडतं खाणं कोणतं असे प्रश्न विचारता विचारता समीरा थेट त्यांना लग्नाचीच मागणी घालताना दिसते. 

अनोख्या अंदाजात समीरानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा गाजत आहे. मुळात स्वत: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या समीरानं ज्या धाडसानं अॅलेक्सारुपी बिग बींना का असेना पण लग्नासाठी विचारलं आहे तिच्या या धाडसाचं चाहत्यांच्या वर्तुळातून कौतुकच होताना दिसत आहे.