मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचं सोशल मीडिया अकाऊंट म्हणजे सतत काही ना काही घडत असणारं एक अकाऊंट. कर्करोग म्हणजेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराकडेही मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या सोनालीने कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना काही महत्त्वाचे संदेश दिले आहेत.
परदेशात असतानाही चाहत्यांच्या संपर्कात असणारी सोनाली कर्करोगावर मात करुन भारतात आली तेव्हा अनेकांनाच आनंद झाला. गंभी आजारावर मात करणाऱ्या सोनालीने सध्याच्या घडीला एक नवं आव्हान हाती घेतलं आहे. त्याविषयीचाच एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आपण अॅक्वा थेरेपी सुरु केल्याचं तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. व्यायामाच्या विविध प्रकारांपैकी असा हा एक प्रकार. नावावरुनच तुम्हाला अंदाज आला असेल की हा व्यायाम प्रकार पाण्याशी संबंधीत आहे. ज्यामध्ये कमरेखालचा भाग पाण्यात असून, त्याच अवस्थेत व्यायामाचे काही प्रकार करावे लागत असल्याचं सोनालीचा व्हिहिडो पाहून लक्षात येत आहे.
प्रथमदर्शनी हा व्यायामप्रकार अत्यंत सोपा असल्याचं भासत आहे. पण, मुळात तो कठीण असल्याचं खुद्द सोनालीनेच सांगितलं आहे. #MyNewNormal असा हॅशटॅग तिने या व्हिडिओसोबत जोडला आहे. कारणं देण्याऐवजी एखाद्या गोष्टीवर तोडगा देण्याची स्वत:साठी फायद्याची ठरणारी सोनालीही ही शक्कल इतरांसाठीही तितकीच प्रेरणादायी आणि नवी आहे, असं म्हणायला हरकत नाही.