तुम्ही नक्की कसले पैसे घेता, भरमसाट वीजबिलाने अभिनेत्रीला झटका

मागील तीन महिन्यांमध्ये.....    

Updated: Jun 29, 2020, 07:38 AM IST
तुम्ही नक्की कसले पैसे घेता, भरमसाट वीजबिलाने अभिनेत्रीला झटका
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वीज बिलाच्या बाबतील बऱ्याच चर्चा, घोषणा आणि काही अंशी काही आदेशांची अंमलबजावणी झाल्याचं पाहायला मिळालं. पण, जून महिन्यांमध्ये मात्र वीज बिल हाती आल्यावर अनेकांचीच झोप उडाली, काहींना बिलावरील देय रकमेचा आकडे पाहून झटकाच बसला. अगदी सेलिब्रिटीसुद्धा यात मागे राहिले नाहीत. 

लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्री Taapsee Pannu तापसी पन्नू हिचं ट्विट पाहून हेच लक्षात येत आहे. लॉकडाऊन कालावधीदरम्यानच्या वीज बिलाची रक्कम पाहून तापसीचा संताप अनावर झाला असून, तिनं ट्विट करत वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीला याबाबता थेट सवाल केला आहे. 

'तीन महिन्यांच्या या लॉकडाऊनमध्ये मी हाच विचार करत आहे, की घरात मी कोणती नवी उपकरणं घेतली? किंवा मग मागच्या महिन्यात असं काही घेतलं का की माझ्या वीज बिलाच्या रकमेत इतकी झपाट्यानं वाढ झाली. तुम्ही आमच्याकडून नेमके कसले पैसे आकारता?', असं ट्विट करत तिनं बिलाची प्रतही सोबत जोडली. 

तापसीने सोबत जोडललेला फोटो पाहता त्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तिला ४३९० इतकं बिल आलं होतं, तर मे महिन्यात हेच बिल ३८५० इतकं असल्याचं उघड झालं. बिलाची हीच रक्कम जून महिन्यायत मात्र थेट ३६००० वर पोहोचली आहे. तापसी इतक्यावरच थांबली नाही. तर, तिनं कोणीही न राहत असलेल्या घरातही अशाच प्रकारचं वीज बिल आल्याची तक्रार केली. 

 

फक्त तापसीच नव्हे तर, अभिनेता- विनोदवीर वीर दास यानंही ट्विट करत वीज बिलांमध्ये झालेली ही वाढ निदर्शनास आणून दिली आहे. ज्याला दुजोरा देत डिनो, कनिज सुरेखा, श्रुती सेठ, अमर्त्य दस्तूर यांनीही आपण हीच बाब उजेडात आणणार होतो असं म्हणत नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं एकंदर वाढीव वीज बिलानं फक्त सर्वसामान्यच नव्हे, तर सेलिब्रिटी मंडळींनाही जोर का झटका लागला आहे हेच चित्र दिसत आहे.