'दिग्दर्शक अचानक माझ्या मागे येऊन उभा राहिला अन्...', तब्बूने सांगितला 'तो' किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) सध्या 'औरो मे कहाँ दम था' चित्रपटामुळे चर्चेत असून, यानिमित्ताने तिने अनेक मुलाखतींमध्ये आपला प्रवास उलगडला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 20, 2024, 08:25 PM IST
'दिग्दर्शक अचानक माझ्या मागे येऊन उभा राहिला अन्...', तब्बूने सांगितला 'तो' किस्सा title=

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) आगामी चित्रपट 'औरो मे कहाँ दम था' मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती अजय देवगणसोबत (Ajay Devgan) झळकणार आहे. या चित्रपटात जिमी शेरगिलही (Jimmy Shergil) प्रमुख भूमिकेत आहे. अजय देवगण आणि तब्बूचा हा एकत्रित 10 वा चित्रपट आहे. 90 चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या तब्बूने नव्या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमधील आपला प्रवास उलगडला आहे. अशाच एका मुलाखतीत तिने 'विरासत' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा काय झालं होतं याचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी तब्बूलाही काही वेळासाठी आश्चर्याचा धक्का बसला होता.

तब्बूच्या सुपरहिट चित्रपटांचा उल्लेख होतो तेव्हा त्यात विरासतचाही उल्लेख होतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटात तब्बूने ग्रामीण भागातील मुलीची भूमिका निभावली होती. तब्बू ग्रामीण भागातील मुलगी दिसावी यासाठी प्रियदर्शन यांनी तेलाची बाटली डोक्यावर ओतली होती असा खुलासा तिने केला आहे. 

तब्बूने सांगितलं की, "प्रियदर्शन यांना मी एकदम ग्रामीण भूमिकेत दिसायला हवी होती. माझे केस त्यांना तेलकट हवे होते. त्यामुळे हेअरस्टायलिस्टने मला सांगितलं की, थोडं जेल घेऊन डोक्याला लाव त्यामुळे ते तेलकट दिसतील. मी जेव्हा सेटवर पोहोचले तेव्हा ते म्हणाले की, 'मी तुला केसांना तेल लावायला सांगितलं होतं'. मी म्हणाली, 'हो थोडंसं. ते आता चमकत आहेत'. यानंतर ते गेले आणि थोड्या वेळाने नारळ तेलाच्या बाटलीसह आले. ते माझ्या मागे उभे राहिले आणि सगळी बाटली माझ्या डोक्यावर ओतली".

"केसांना तेल म्हणजे मला हे अपेक्षित आहे असं ते म्हणाले. पण त्यानंतर माझ्यासाठी अनेक गोष्टी सहज झाल्या. मला कोणतीही हेअरस्टाईल करण्याची गरज नव्हती. मी पाच मिनिटांमध्ये तयार व्हायचे. मोठ्या केसांना तेल लावून सेवटर पोहोचायचे," असं तब्बूने पुढे सांगितलं. 

विरासत हा तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात अनिल कपूर, तब्बू आणि पूजा भत्रा यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. तब्बूने चित्रपटात ग्रामीण भागातील साध्या मुलीची भूमिका निभावली होती. 

Tags: