पत्नीच्या नावे फसवणूक, श्रेयस तळपदेचा सावधगिरीचा इशारा

या प्रकाराची माहिती मिळताच श्रेयस म्हणाला... 

Updated: Jul 11, 2019, 12:29 PM IST
पत्नीच्या नावे फसवणूक, श्रेयस तळपदेचा सावधगिरीचा इशारा

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या चाहत्यांना आवाहन करत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये याविषयी सतर्क केलं आहे. पत्नी दिप्ती तळपदे हिच्या नावाचा वापर करत एक व्यक्ती अॅमेझॉनची कास्टींग हेड असल्याचं इतरांना भासवत असल्याचा खळबळजनक खुलासा त्याने केला. 

हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया श्रेयसने दिली. 'हे सारं प्रकरणं ज्यावेळी आमच्यापर्यंत आलं, तेव्हा आम्हाला धक्काच बसला. आमच्या एका मित्राने यासंबंधीचे स्क्रीनशॉट पाठवले होते. ज्यामध्ये फसवणुक करणारी व्यक्ती ही दिप्तीच्या काही फोटोंचाही वापर करत असल्याचं लक्षात आलं. हे सर्व अतिशय धक्कादायक आणि मन विचलीत करणारं होतं', असं श्रेयस म्हणाला. 

'आयएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने सर्वांनाच या प्रकरणी सतर्क राहण्याचा इशाराही दिला. दीप्ती ही एक स्वतंत्र निर्माती असून, तिने बऱ्याच चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ती अॅमेझॉनमध्ये कास्टींग डिरेक्टर नसून कोणीही तिच्या नावे होणाऱ्या या फसवुकीला बळी पडू नका, असंही त्याने स्पष्ट केलं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयसची पत्नी दिप्ती हिच्या काही फोटोंचा वापर करत एक व्यक्ती इतरांची फसवणूक करत आहे. अनेकांनाच ती अॅमेझॉनमध्ये कास्टींग हेड असल्याचं सांगत आगामी चित्रपटाचं कारण देत संबंधीत व्यक्तीकडून त्यांचे फोटो (प्रोफाईल) मागवत फसवणूक करण्याचं सत्र सुरु आहे.