मुंबई : कलाविश्वात अनेकदा सेलिब्रिटी मंडळींच्या मैत्रीपूर्ण नात्याची चर्चा पाहायला मिळते. अनपेक्षितपणे समोर आलेली एखादी व्यक्ती जीवनात इतकी महत्त्वाची होऊन जाते की, नात्यांचे ते बंध हेवा वाटेल इतके दृढ होऊन जातात. अशा या मैत्रीपूर्ण किंबहुना आदरयुक्त आणि एका वेगळ्याच नात्याची प्रचिती अभिनेते बोमन इराणी यांनाही आली. हे नातं होतं मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर जोशी यांच्यासोबतचं.
आपल्या अभिनयाच्या बळावर कलाविश्वात मानाचं स्थान निर्माण करणाऱ्या सुधीर जोशी यांच्यासोबत काम करण्यासोबतचा अऩुभव शेअर केला. सुधीर जोशी यांच्यासोबत काम करणं म्हणजे कोणा एका महाविद्यालयात काम करणंच जणू, अशा शब्दांत त्यांनी या नात्याचा उलगडा केला.
सुधीर जोशी यांनी मला खुप साऱ्या गोष्टी शिकवल्या असं इराणी यांनी न विसरता सांगितलं. मराठी रंगभूमीबाबतही त्यांनी बरीच चर्चा केली. 'सुधीर जोशी यांनी मला भेटण्यापूर्वी जवळपास हजार वेळेस रंगभूमीवर प्रवेश केला. आमची विचार करण्याची क्षमता जवळपास एकसारखी होती. विचार जुळत होते, मुख्य म्हणजे कोणाच्या डोक्यात काय सुरु आहे याची आम्हाला माहिती होती', असं इराणी म्हणाले.
जीवनात आपल्याला सर्वात अविस्मरणीय आणि मौल्यवान दाद तही सुधीर जोशींनीच दिली हेसुद्धा बोमन इराणी यांनी यावेळी सांगितलं. ही आठवण सांगताना ते काहीसे भावुकही झाले. 'आय एम नॉट बाजीराव' या नाटकाच्या प्रयोगावेळी जेव्हा ते विंगेत आले तेव्हा त्यांनी आपल्याया सॅल्यूट केला, ही आठवण सांगताना एका मोठ्या कलाकाराची महानता बोमन इराणी यांनी सर्वांसमोर ठेवली.
सोरभ पंत या युट्युबरसह असणाऱ्या एका लाईव्ह सेशलमध्ये सुधीर जोशींच्या काही आठवणी सांगताना इराणी म्हणाले, 'सुधीर जोशी यांचं माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर फार प्रेम आणि आपुलकी होती. अशाच एका दसरा अथवा दिवाळीच्या वेळी पूजेला बसण्यासाठी विवाहित जोडीची आवश्कता होती. तेव्हा जोशी यांना मुलबाळ नसल्यामुळं त्यांनी मलाच पूजेला बसशील का असं विचारलं. तेव्हा मराठमोळ्या वेशात मी आणि पत्नी झेनोबिया त्या (सत्यनारायणाच्या) पूजेला बसलो'.
जोशींच्या घरी पूजेसाठी बसणं हे अतिशय भाग्याचं होतं, असं म्हणत आपल्याला त्यांनी कुटुंबातील व्यक्तीचाच दर्जा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बोमन इराणी हे सुधीर जोशींना त्यांच्या मुलाप्रमाणंच होते. असं हे नातं अनपेक्षितपणे सर्वांसमोर आलं आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच स्मित उमटलं. एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला दिलेला हा मान शब्दांतही व्यक्त करणं कठीणंच.