Aira Gaira song video : मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये 'तिची'ही एन्ट्री...

गाण्यावर धरला ठेका आणि... 

Updated: Apr 14, 2019, 06:14 PM IST
Aira Gaira song video : मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये 'तिची'ही एन्ट्री...  title=
कलंक

मुंबई: आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा 'कलंक' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटातील आणखी एक चेहरा नुकता प्रेक्षकांसमोर आला आहे. तो चेहरा पाहता 'कलंक'मध्ये तिची एन्ट्री झालीच, असं म्हणायला हरकत नाही. आता हा चेहरा नेमका कोणाचा....? असाच प्रश्न तुम्हाला पडतोय ना? तर, हा चेहरा आहे अभिनेत्री क्रिती सेनन हिचा. 

'ऐरा- गैरा...' या गाण्याच्या निमित्ताने 'कलंक'मधील आणखी एक दमदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्यांवर अनेकांचेच पाय थिरकत आहेत. अमिताभ भट्टाचार्यने लिहिलेल्या आणि प्रितमने संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात क्रितीचंही नृत्यकौशल्य पाहायला मिळत आहे. तर, आदित्य आणि वरुणच्याही नृत्यकौशल्याची प्रचिती या गाण्यातून येत आहे. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत या गाण्याचा ठेका तुम्हालाही त्यावर ताल धरायला लावेल असाच आहे. 

'घर मोहे परदेसियाँ...', 'कलंक नही...' अशा गाण्यांनंतर प्रदर्शित झालेल्या 'ऐरा- गैरा'ने चाहत्यांवर फार कमी वेळात भुरळ पाडली आहे. त्यातही क्रितीचा अनोखा अंदाजही गाण्यातील प्रमुख आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यामुळे एकंदरच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यासाठीची वातावरण निर्मिती करण्याचं 'कलंक'च्या निर्माते- दिग्दर्शकांचं तंत्र चित्रपटासाठी फायद्याचं ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अतिभव्य सेटवर साकारण्यात आलेल्या कलंक या चित्रपटातून १९४० चा काळ साकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि तितक्यात अनोख्या काळाची सफर घडणार हे खरं. करण जोहरसाठी हा चित्रपट म्हणजे एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ठरत असून, या चित्रपटाकडून त्याच्याही फार अपेक्षा असल्याचं स्पष्ट होत आहे.