Sunita Williams Space Mission : अवकाश मोहिमेसाठी मागील कैक महिने अंतराळात असणाऱ्या सुनीता विलियम्स नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पृथ्वीववर परततील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, आता मात्र निर्धारित वेळेत म्हणजे 2025 मधील फेब्रुवारी महिन्यातही त्यांची घरवापसी होणार नाहीय. उपलब्ध माहितीनुसार यासाठीची मोहिम आणखी लांबणीवर पडली असून, आता विलियम्स साधारण महिनाभर उशिरानं पृथ्वीवर परतणार असल्याचं म्हटलं जात आहे.
SpaceX च्या Dragon कॅप्स्युलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं ही मोहिम लांबणीवर पडणार असून, त्यामुळंच विलियम्स यांचा अवकाशातील मुक्काम आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे. जून 2024 मध्ये अवघ्या 10 दिवसांच्या अवकाश मोहिमेसाठी भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराशवीर सुनीता विलियम्स अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. पण, 10 महिन्यांहून अधिक काळ उलटूनही त्या अद्यापही पृथ्वीवर परतू शकलेल्या नाहीत. दरम्यान, नासानं या मोहिमेतील नवी अपडेट नुकतीच अधिकृत ब्लॉगच्या माध्यमातून दिली.
NASA आणि स्पेस एक्सच्या माध्यमातून Crew10 ही मोहिम राबवण्यात येणार होती. आता मात्र त्यास आणखी विलंब होणार असल्याची माहिती आहे. या मोहिमेसाठी एक ड्रॅगन स्पेसक्राफ्ट बनवण्याचं काम सुरू असून, या कॅप्स्युलमध्ये चार व्यक्तींना प्रवास करता येणं शक्य असेल. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळ जाणार असल्यामुळं नासाकडून अवकाशातील अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यास आणखी वेळ दवडला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
बोईंग स्टारलायनरमधील आय हेलियम गळती आणि थ्रस्टर्समधील बिघाडामुळं विलियम्स यांचा अवकाशातील मुक्काम वाढला. विलियम्स यांच्यास बुच विल्मोर हे सहकारी अंतराळयात्रीसुद्धा सध्या पृथ्वीपासून हजारो मैल दूर असून, तिथं त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. ISS वर असणाऱ्या इतर अंतराळवीरांच्या कामात हे दोघंही मदतीचा हात पुढे करत आहेत.
नासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना तिथं कोणताही धोका नसून, पुढील 3 महिन्यांपर्यंत त्यांना तिथं कोणत्याही अडचणीविना वास्तव्य करता येईल असं म्हटलं जात आहे. ISS वर सध्या विलियम्स आणि विल्मोर यांच्यासह इतर 9 अंतराळयात्री उपस्थित असून, एखाद्या अंतराळवीराला निर्धारित वेळेत पृथ्वीवर परतता न येण्याची ही पहिलीच घटना नाहीय. पण, सुनीता विलियम्स यांच्याइतका विलंब मात्र इतर कोणाला लागला नाही हेसुद्धा तितकंच खरं.