सलमान कोणाला म्हणतोय 'प्युअर, इनोसंट, मासूम'?

त्याच्या जीवनातील खास मंडळींना भेटलात का?   

Updated: Oct 22, 2019, 06:52 PM IST
सलमान कोणाला म्हणतोय 'प्युअर, इनोसंट, मासूम'?

मुंबई : 'स्वागत नही करोगे हमारा.... ?' असं म्हणत धमाकेदार एंट्री मारणारा सलमान सर्वांचीच मनं जिंकून जातो. सध्या हाच सलमान स्वत:च्या स्वागतासाठी नव्हे, तर एका खास व्यक्तीच्या स्वागतासाठी मेहनत घेत आहे. ही व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक- अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर. 

मांजरेकरांच्या लेकीच्या स्वागतासाठी सलमान सध्या एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतोय. 'दबंग ३' या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर नव्या अंदाजात तो दिसणार आहे. त्याच्यासोबतच सई मांजरेकर हीसुद्धा या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी कलाविश्वात एक अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. 

सई या चित्रपटामध्ये 'खुशी' ही भूमिका साकारत आहे. 'हमारी प्युअर, इनोसंट, मासूम खुशी', असं कॅप्शन देत त्याने या चित्रपटातील तिच्या भूमिकेवरुन पडदा उचलला आहे. यामध्ये 'खुशी' म्हणजेच सई गुलाबी रंगाच्या अगदी सोबर अशा लेहंग्यामध्ये दिसत आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य, रोखलेली नजर असं तिचं रुप सलमानच काय, तर चाहत्यांच्याही मनात घर करत आहे. 

सईव्यतिरिक्त 'दबंग खान'ने त्याच्या या आगामी चित्रपटाचे आणखीही काही पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये 'रज्जो' साकारणाऱ्या सोनाक्षीचा डॅशिंग लूक, तर चुलबूल साकारणाऱ्या खुद्द सलमानचा दमदार अंदाज पाहायला मिळाला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्सची निर्मिती असणारा दबंग ३ हा २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागांना मिळालेली लोकप्रियता पाहता आता हा तिसरा भागही बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाईचे आकडे ओलांडतो का, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.