मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुशांत सिंह राजपूतसोबत ती या चित्रपटात स्क्रिन शेअर करत असून, तिचा अंदाज आणि एकंदर रुपेरी पडद्यावर असणारा वावर या सर्व गोष्टी अनेकांचच लक्ष वेधत आहेत.
'केदारनाथ'च्या निमित्ताने सारा अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच तिच्या अभिनयाची प्रशंसा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता भर म्हणून या आगामी चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'जाँनिसार है...' असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये आपल्या हृदयाच्या अतिशय जवळ असणाऱ्या व्यक्तीपासून दूर होणं, ती व्यक्ती समोर असतानाही त्याच्याशी किंवा तिच्याशी तोडून वागणं, विरहाची वेदना सहन करणं या साऱ्याची झलक या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
अरिजित सिंगने हे गाणं गायलं असून अमित त्रिवेदीने ते संगीतबद्ध केलं आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या दरीमुळे चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या सारा आणि सुशांतला त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात नेमक्या कशा अडचणी येतात हेसुद्धा गाण्यातून पाहायला मिळत आहे.
अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याचे बोल, त्याची चाल आणि पडद्यावरील दृश्य याचा सुरेख मेळ साधला गेल्यामुळे पुन्हा एकदा ही 'केदारनाथ'च्या जमेची बाजू ठरत आहे. त्यामुळे आता ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट खऱ्या अर्थाने साराचं भविष्य ठरवणार असंच म्हणावं लागेल.