मुंबई : सत्यघटना, एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास किंवा णग एखादी काल्पनिक कथा अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहेत. प्रयोगशीलतेच्या बळावर साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटांना प्रेक्षकांचीही तितकीच पसंती मिळाली आहे.
प्रयोगशीलतेचीच साथ घेत आणि एका नव्या चेहऱ्याना नवी ओळख मिळवून देण्याचा मानस उराशी बाळगत दिग्दर्शक अभिषेक कपूर याने त्याच्या 'केदारनाथ' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
जवळपास दी़ड मिनिटाच्या या टीझरची सुरुवात होते तिच केदारनाथ मंदीर परिसरात काही वर्षांपूर्वीच आलेल्या एका अशा नैसर्गित आपत्तीच्या दृश्यांनी, ज्याच्या स्मृती आजही कायम आहेत.
आपत्ती, प्रेम, विश्वास, निसर्गाचा कोप आणि दाटून आलेल्या भावना या साऱ्या गोष्टी 'केदारनाथ'मध्ये एकवटल्या असल्याचं टीझर पाहून लक्षात येत आहे.
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत असून आता खऱ्या अर्थाने तिचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं असं म्हणायला हरकत नाही.
सारा आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री येत्या काळात चित्रपटाच्या यशात किती योगदान देते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी 'इस साल करेंगे सामना प्रकृती के क्रोध का और साथ होगा सिर्फ प्यार', असं म्हणत चित्रपटाविषयी पूर्वकल्पना देणारा हा टीझर किती गाजतो याकडेही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचं लक्ष लागून राहिलेलं असणार हे खरं.