मुंबई : दिवसाची सुरुवात झालेली असतानाच गुरुवारी अत्यंत दु:खद बातमी समोर आली. हिंदी कलाजगतामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. 3 ऑगस्टला सायंकाळी लखनऊ येथे अखेरचा श्वास घेणाऱ्या या अभिनेत्याचं नाव, मिथिलेश चतुर्वेदी. (Bollywood movie koi mil gaya fame actor Mithilesh Chaturvedi Death)
गेल्या काही दिवसांपासून ते हृदयरोगाच्या समस्यांशी झुंज देत होते. काही काळापूर्वी त्यांना हृदयरोगाचा झटकाही आला होता. ज्यांतर ते मूळ गावी, अर्थात लखनऊ येथे वास्तव्यास गेले होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'कोई मिल गया' चित्रपटाच्या निमित्तानं Mithilesh Chaturvedi यांच्यासोबत काम केलेल्या जयदीप सेन यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. इतक्या चांगल्या व्यक्तीला गमावण्याचं दु:ख शब्दांत मांडता येणं अशक्य अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
कशी होती बॉलिवूडमधील कारकिर्द?
चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'भाई भाई' हा त्यांचा पहिला चित्रपट. यानंतर 'सत्या', 'ताल', 'फिजा', 'रोड', 'कोई मिल गया', 'बंटी और बबली', 'क्रिश' आणि 'गांधी माय फादर' या चित्रपटांमध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली.
2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'Scam 1992' या वेब सीरिजमध्येही ते झळकले होते. सध्या ते Banchhada नावाच्या एका चित्रपटासाठी काम करत असल्याची माहितीही समोर आली. एकाएकी मिथिलेश चतुर्वेदी यांच्या जाण्यानं कलाजगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.