मुंबई : सध्याच्या घडीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या तुलनेत यापीर्वीच्या काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. त्या चित्रपटातील पात्र म्हणू नका, कथानक म्हणू नका किंवा मग गाणी. प्रेक्षकांवर आजही अशा काही चित्रपटांची भुरळ कायम आहे. ज्यामधीलच एक नाव म्हणजे 'कुछ कुछ होता है'. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट मैत्री आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात ही बाब अत्यंत परिणामकारकपणे सांगून गेला. अशा या चित्रपटातील आणखीही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. त्यातील एक म्हणजे 'मिस ब्रगेन्झा'.
महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अर्चना पूरण सिंग हिने अतिशय सुरेखपणे 'मिस. ब्रगेन्झा' साकारली होती. तिच्या याच भूमिकेपासून 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात करीनाने साकारलेल्या व्यक्तीरेखेसाठीची प्रेरणा घेण्यात आली होती. प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या या भूमिकेविषयीच्या आठवणी खुद्द अर्चनानेच काजोल आणि दिग्दर्शक करण जोहर याच्याच उपस्थितीत एका टेलिव्हिजन कार्यक्रमात जागवल्या.
पाहा 'मिस ब्रगेन्झा'ची एक झलक.....
'मिस ब्रगेन्झा ही आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपैकी सर्वात अविस्मरणीय भूमिका आहे. ज्यामध्ये तिची स्टाईल, देहबोली या साऱ्यात अफलातून असं वेगळेपण आणण्याचं श्रेय करण जोहरला जातं', असा खुलासा तिने केला. सोबतच ही काहीशी वेगळी आणि तितकीच रंजक व्यक्तीरेखा साकारण्याची संधी दिल्याबद्दल तिने करण जोहरचे आभारही मानले.