स्वप्न पाहणारेच 'पंगा' घेतात

पाहा कंगनाचा नवा लूक....   

Updated: Dec 19, 2019, 06:57 PM IST
स्वप्न पाहणारेच 'पंगा' घेतात
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री Kangana Ranaut कंगना रानौत सध्याच्या घडीला तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र दिसत आहे. कंगना येत्या काळात Panga 'पंगा' या चित्रपटातून एका कबड्डीपटूच्या भूमिकेत झळकणार असल्याचं काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. याच रुपातील तिची झलक आता या चित्रपटाच्या पोस्टरमधून पाहायला मिळत आहे. 

अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित 'पंगा' हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीचट या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरवर कंगना साडीमध्ये दिसत असून, प्रथमदर्शनी ती एका गृहिणीच्या रुपात असल्याचं कळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये ती कोणा एका गोष्टीकडे एकटक बघताना दिसत आहे. यामध्ये कंगनाच्या चेहऱ्यावर असणारं हास्य सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहे. 

'जया लेकर आ रही है अपनी और कुछ आपसे जुडी कहानी थोडी देर मे...' असं कॅप्शन देत 'फॉक्स स्टार हिंदी'च्या अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला. 'पंगा'च्या पोस्टरवरही 'जो सपने देखते हैं वो पंगा लेते हैं|' असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट आतापासूनच त्याच्या कथानकाविषयीची उत्सुकता जागवणारा ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

एकामागोमाग एक 'पंगा'चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, या चित्रपटात बी- टाऊनच्या या क्वीनचं चित्रपटातील कुटुंबही पाहायला मिळत आहे. जस्सीने कंगनाच्या पतीची भूमिका साकारली असून, एका हसत्याखेळत्या कुटुंबाची झलकही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता येत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच २४ जानेवारी, २०२०ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.