पोलीस अधिकारी ते हिंदी कलाविश्वातील अभिनेता.... असे होते राजकुमार

'जानी....ssss' 

Updated: Oct 8, 2019, 11:58 AM IST
पोलीस अधिकारी ते हिंदी कलाविश्वातील अभिनेता.... असे होते राजकुमार  title=

मुंबई : 'जानी....ssss' असं म्हणणाऱ्या अभिनेता राजकुमार यांचा अंदाज म्हणजे कलाविश्वात सर्वांचीच मनं जिंकणारा. मुळात काही अभिनेते हे त्यांच्या रुबाबासाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक नाव म्हणजे राजकुमार. अशा या अभिनेत्याचं रुपेरी पडद्यावरील आयुष्य जितकं रंजक वाटतं, तितकंच खासगी आयुष्यही रंजक होतं. काही अशा गोष्टी घडून गेल्या होत्या ज्यांनी राजकुमार यांच्या आयुष्याला वेगळ्या वळणांवर नेऊन ठेवलं. 

पडद्यावर रुबाबदार दिसणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात प्रचंड फटकळ होता, असं म्हणतात. अनेकांना राजकुमार यांचे बोचरे शब्द कायमस्वरुपी स्मरणातही राहिले असतील असेच होते. बिग बी अमिताभ बच्चन आणि गोविंदासुद्धा यापासून वाचलेले नव्हते. 

पाकिस्तान येथील बलुचिस्तान प्रांतात ८ ऑक्टोबर १९२६ रोजी राजकुमार यांचा जन्म झाला होता. कुलभूषण पंडित असं त्यांचं खरं नाव होतं. फाळणीआधीच ते १९४० मध्ये मुंबईत आले होते. असं म्हटलं जातं की पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी माहिम पोलीस स्थानकात सब इन्स्पेक्टर पदावर जबाबदारी सांभाळली होती. 

ज्या पोलीस स्थानकात त्यांना रुजू करण्यात आलं होतं, तेथे वारंवार चित्रपट वर्तुळातील कलाकारांची ये- जा असे. एकदा चित्रपट निर्माते बलदेव काही कामानिमित्त पोलीस स्थानकात आले आणि राजकुमार यांच्या एकंदर शैलीने प्रभावित झाले. निर्मात्यांकडून चित्रपटांमध्ये काम करण्याविषयीची विचारणा होताच, त्यांनी लगेचच हा प्रस्ताव स्वीकारत नोकरीचा राजीनामा देत कलाविश्वात पाऊल ठेवलं. 

विमानप्रवासातच मिळाली जोडीदार... 

राजकुमार आणि त्यांची पत्नी जेनिफर यांची पहिली भेट ही एका विमान प्रवासादरम्यान झाली होती. जेनिफर या त्या विमानात फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करत होत्या. पहिल्याच नजरेत झालेलं हे प्रेम थेट लग्नापर्यंत जाऊन पोहोचलं. ज्यानंतर जेनिफर यांनी त्यांचं नाव बदलत 'गायत्री', असं ठेवलं.