मुंबई : ९० च्या दशकामध्ये बॉलीवूड आणि दक्षिणेतल्या बहुतेक चित्रपटात दिसणारे खलनायक म्हणजे रामी रेड्डी. पण मरणापूर्वीचे रामी रेड्डींचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रामी रेड्डींचे हे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
यकृताच्या आजारानं रामी रेड्डींना ग्रासलं होतं. या आजारामुळेच त्यांचं वजन अर्ध्याहूनही कमी झालं होतं. यकृतानंतर मूत्रपिंडाचा आजारही रामी रेड्डींना झाला आणि १४ एप्रिल २०११ला रामी रेड्डींचं सिकंदराबादमध्ये निधन झालं. शरिराची ही अवस्था झाल्यामुळे रामी रेड्डी घराबाहेरही पडत नव्हते. पण एका कार्यक्रमाला ते गेले असताना त्यांचं हे रूप पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
रामी रेड्डींचा १९९३मधला 'वक्त हमारा है'मधला कर्नल चिकारा आणि 'प्रतिबंध'मधला अन्ना चांगलाच गाजला. रामी रेड्डींनी २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. १९९०मध्ये रामी रेड्डींनी 'अंकुशम' या तेलगू चित्रपटामधून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं.
चित्रपट क्षेत्रात येण्याआधी रामी रेड्डी पत्रकार होते. मुन्सिफ डेली या वृत्तपत्रात त्यांनी नोकरीही केली होती. आंध्र प्रदेशच्या उस्मानिया विद्यापीठातून रामी यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं.