'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा वेग मंदावला

समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला विशेष दाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

Updated: May 26, 2019, 05:39 PM IST
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा वेग मंदावला title=

मुंबई : अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट अखेर सिनेमागृहात दाखल झाला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. भाजपाच्या विजयानंतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण प्रत्येक्षात मात्र असे काही होताना दिसले नाही. चित्रपटाने २ दिवसात फक्त २ कोटी ८८ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. 

समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला विशेष दाद मिळत नसल्याचे दिसत आहे. आता येत्या काळात चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती रूपयांची मजल मारेल हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.  

ओमंग कुमार दिग्दर्शित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या अनेक तरखांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याचिका देखील दाखल करण्यात आली होती. 

याचिकेत निवडणुकीदरम्यान चित्रपट प्रदर्शित केल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने निवडणूक काळात 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने चित्रपटावर स्थगिती आणली होती. परंतु २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अखेर २४ मे रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.