नवी दिल्ली : ब्राझील (Brazil) मधील सर्वात प्रसिद्ध गायिका आणि लॅटिन ग्रॅमी विजेती Latin Grammy Winner) मारिलिया मेंडोन्का (Marilia Mendonca) हिचा शुक्रवारी एका कॉन्सर्टला जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला. मारिलिया मेंडोन्का 26 वर्षांची होती.
मारिलिया मेंडोन्का हिच्या कार्यालयाने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की विमानातील इतर चार प्रवाशांचाही मृत्यू झाला. मारिलिया मेंडोन्का हिचे विमान रिओ डी जनेरियोच्या उत्तरेकडील मिनास गेराइस राज्यातील गोयानिया आणि कारटिंगा या लहान शहरादरम्यान कोसळले.
मिनास गेराइस राज्याच्या पोलिसांनीही अपघाताच्या कारणाबाबत फारशी माहिती दिली नाही. पण त्यांनी मारिलिया मेंडोन्का यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अपघातग्रस्त विमान धबधब्याच्या खाली दिसले. मृत्यूपूर्वी, मारिलिया मेंडोन्का यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ती विमानाच्या दिशेने जाताना दिसत होती.
निधनाने चाहते दु:खी
मारिलिया मेंडोन्का ही लोकसंगीत गायची, ज्याला ब्राझीलमध्ये 'सर्टनेजो' म्हणतात. तिच्या गाण्यांमध्ये स्त्रीवादी समस्या हाताळण्यासाठी ती ओळखली जात होती. तिने आपल्या गीतांमधून महिला सक्षमीकरणाचे आवाहन केले. शुक्रवारी संध्याकाळी मारिलिया मेंडोंन्काच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली. मारिलिया मेंडोन्काच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 38 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मारिलिया मेंडोंन्काची मैत्रीण, ब्राझिलियन फुटबॉल स्टार नेमारने ट्विट केले, 'मला यावर विश्वास बसत नाही.' ब्राझील सरकारनेही मारिलिया मेंडोन्का यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मारिलिया मेंडोन्का हिने तिच्या 'Em todos os cantos' या अल्बमसाठी 2019 चा लॅटिन ग्रॅमी पुरस्कार जिंकला.