मुंबई : झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली आहे. त्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी पंकजा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला.
या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये सुबोध भावेनं पंकजा ताईंना एक भन्नाट प्रश्न विचारला आहे. सुबोधनं त्यांना विचारलं की, 'तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडलेत का?' यावर पंकजा ताई गौप्यस्फोट करत म्हणाला, 'होय.. मी आमदार फोडले आहेत.' त्यावर सुबोध विचारतो, कोण आणि कधी?.. त्यावर पंकजा म्हणतात, 'सगळंच सांगत बसले तर एक वेगळा भाग आपल्याला शूट करावा लागेल. पण अनेक लोकांनी आज आमच्याकडे म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या बीड जिल्ह्यात कित्येक राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आमच्याकडे आले आहेत.' असे त्या म्हणाल्या.
पुढे याविषयी बोलताना पंकजा ताई म्हणाल्या, 'आज मी ज्या पदावर काम करत आहे. तिथे या गोष्टी होतातच. राजकारणात आले तेव्हा माझ्या वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही. जर आपल्याकडे बेरीज होत असेल तर काही हरकत नाही. कारण राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला शोभेल असे लोक मी पक्षात घेत असते. आमच्याकडे अर्धेलोक बाहेरूनच आले आहेत. त्यामुळे हे सुरूच राहतं.'
याआधी पंकजा ताईंनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसाच्या काही आठवणी शेअर केल्या. तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना पंकजा हसत म्हणाल्या, 'अजिबात नाही. तो सुखद क्षण मला अनुभवताच आला नाही.' पंकजा यांनी दिलेल्या या उत्तराने तिथे उपस्थितीत असलेले सगळे लोक हसू लागले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे.' यावर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.
पुढे पंकजा यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांविषयी विचारण्यात आला, तेव्हा त्या भन्नाट उत्तर देत म्हणाल्या, 'माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये मुंडे साहेब गृहमंत्री होते. त्यांच्याबरोबर सुरक्षारक्षक असायचे. त्याचबरोबरीने माझ्याबरोबरही तेव्हा सुरक्षारक्षक होते. त्यामुळे मला कॉलेजच्या दिवसांची मजा घेताच आली नाही. सुरक्षारक्षक बघूनच लोक घाबरायचे. पण एकदा कोणाशी मैत्री झाली की ती शेवटपर्यंत असायची.'