'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन

गेल्या बारा दिवसांमध्ये कलाविश्वाला लागलेला हा तिसरा धक्का आहे.  

Updated: May 11, 2020, 05:17 PM IST
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं कर्करोगामुळे निधन title=

मुंबई : 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेते शफीक अंसारी यांचं कर्करोगामुळे निधन झालं आहे. गेल्या बारा दिवसांमध्ये कलाविश्वाला लागलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. चित्रपट आणि टी. व्ही विश्वातील तीन कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. सर्व प्रथम इरफान खान त्यानंतर अभिनेते ऋषी कपूर आणि आता टीव्ही अभिनेते शफीक अंसारी यांच्या निधनामुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. शफीक अंसारी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 

मुंबईच्या मदनपूर परिसरात राहणाऱ्या शफीक अंसारी यांना पोटाचा कर्करोग होता. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी संपूर्ण दिवस त्यांची प्रकृती उत्तम होती. पण संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असं वक्तव्य त्यांच्या पत्नी गौहर अंसारी यांनी झी न्यूजसोबत बोलता केलं. 

शफीक अंसारी ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली आणि आई असा परिवार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाला झुंज देत होते. या काळात अनेकदा त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. अशा कठीन समयी शफीक अंसारींच्या जवळच्या मित्रांनी फार मदत केली असल्याचं देखील त्यांच्या पत्नीने सांगितले.