मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण 'छपाक' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'ओम शांती ओम', 'कॉकटेल' सारख्या सिनेमांमध्ये ग्लॅमरस आणि बोल्ड लूक देणारी दीपिका 'छपाक'मध्ये मात्र अगदी वेगळीच दिसत आहे. ऍसिड पीडित तरूणींवर आधारित सिनेमा करण्यास दीपिका कशी तयार झाली असे अनेक प्रश्न तिला सिनेमाच्या प्रमोशनवेळी विचारण्यात येतात.
या प्रश्नाचं उत्तर दीपिकाने नुकतंच एएनआयला दिलं आहे. मंगळवारी दीपिका 'छपाक'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यावेळी तिने 'छपाक' सिनेमा समाजावर एक वेगळा प्रभाव पाडेल अशी इच्छा व्यक्त केली.
'मला या सिनेमात काम ही करायचं होतं आणि या सिनेमाची निर्मीती देखील करायची होती. कारण 'छपाक'ची सकारात्मक गोष्ट मला फक्त समाजातच नाही तर संपूर्ण देशात आणि जगभरात पोहोचवायची आहे. एवढंच नव्हे तर लक्ष्मी अग्रवाल आणि तिच्यासारख्या असंख्य ऍसिड पीडित तरूणीचं जगणं हे सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. अशा घटनांना सामोरे जाऊनही या तरूणी जगाकडे कशापद्धतीने पाहतात हे मला सगळ्यांसमोर आणायचं होतं, असं दीपिका सांगते.
त्याचप्रमाणे दीपिकाने समाज या तरूणींना कशी वागणूक देतो यावरही भाष्य केलं आहे. आपण ऍसिड पीडित तरूणींना सामान्यांप्रमाणे वागणूक न देता त्यांना दिव्यांग व्यक्तींप्रमाणे वागवतो. त्यांच आयुष्य आपल्यापेक्षा काही वेगळं नाही पण तरीदेखील आपण त्यांना अशी वागणूक देतो. आपण त्यांना सहानुभूती न देता समान वागणूक द्यायला हवी, हे सांगायला देखील दीपिका विसरली नाही.
'छपाक' सिनेमात अत्यंत छोटा पण अगदी महत्वाचा संदेश देण्यात आला आहे. हा सिनेमा लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड पीडित तरूणीच्या सत्यघटनेवर आधारित आहे. 15 वर्षांच्या लक्ष्मीवर 2005 साली एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला करण्यात आला होता. या हल्यानंतर लक्ष्मीवर असंख्य शस्त्रक्रिया करण्यात आला. त्यानंतर लक्ष्मीने ऍसिड पीडित तरूणींसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
'छपाक' या सिनेमाचं दिग्दर्शन अत्यंत संवेदनशील व्यक्ती मेघना गुलजार यांनी केलं असून हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.