मुंबई : गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) नवरात्रीच्या काळात तिचं दांडिया आणि गरब्याच्या गाण्यासाठी चर्चेत असते. सध्या दांडियाचा सिझन आहे पण फाल्गुनी काही वेगळ्या कारणानं चर्चेत आली आहे. फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यातील गाण्यावरून झालेला वाद सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. नेहानं तिच्या जुन्या 'मै पायल है छनकाई' या गाण्याचा रिमेक बनवला होता जे फाल्गुनीला आवडलं नाही आणि तिनं नेहावर टीका केली.
दरम्यान, लोक पुन्हा एकदा फाल्गुनीची जुनी गाणी ऐकू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात यूट्यूबवर फाल्गुनीच्या गाण्यांवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. फाल्गुनी पाठकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकजण शोध घेत आहेत. चला तर जाणून घेऊया फाल्गुनीच्या आयुष्याविषयी...
फाल्गुनी पाठक दांडिया क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा जन्म खारमध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. रेडिओवर गाणी ऐकून त्यांच्यात हा छंद जागृत झाला. असे म्हटले जाते की वयाच्या 9 व्या वर्षी फाल्गुनीनं 15 ऑगस्ट रोजी एक स्टेज परफॉर्मन्स दिला होता, ज्यावर त्यांचे वडील खूप रागावले होते. (Falguni pathak age marriage and why she dress like a boy know about everything)
फाल्गुनीनं स्टेजवर 'लैला में लैला हे गाणे गायलं. रिपोर्ट्सनुसार, फाल्गुनीच्या वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी तिला मारहाणही केली असावी. फाल्गुनीची आई तिच्या छंदाला साथ देत होती. फाल्गुनीनं तिच्या आईकडून गुजराती लोकगीते शिकली, त्यानंतर तिनं नवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये कोरस म्हणून गायला सुरुवात केली.
फाल्गुनी पाठक लहानपणी खूपच क्यूट दिसायची, पण तिला आपण कायम बॉयकट हेअरस्टाईल मध्येच पाहिलं आहे, शिवाय ती कायम मुलांच्या गेटअपमध्ये राहते. यामागचं कारण असं सांगितलं की, फाल्गुनीच्या आधी तिला 4 बहिणी होत्या. आई-वडिलांना मुलगा हवा होता, पण फाल्गुनीच्या रूपाने पुन्हा मुलगी झाली. रिपोर्ट्सनुसार फाल्गुनीच्या बहिणी तिला मुलांप्रमाणे कपडे परिधान करायच्या आणि पुढे जाऊन तिला याच कपड्यांची सवय झाली आणि तीच तिची ओळख ठरली.
फाल्गुनीचे वय 58 असून तिनं अद्याप लग्न केलेलं नाही. 1998 मध्ये तिचा पहिला अल्बम 'याद पिया की आने लगी' प्रदर्शित झालं, त्यानंतर ती लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. तिची गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.