कोलकाता: अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला रविवारी म्हणजे आज पोलिसांनी पाकिट मार आणि चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. ही अभिनेत्री गर्दीच्या ठिकाणी लोकांचे पाकिट मारत असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा पोलिसांनी तिला रंगेहात पकडलं, तेव्हा तिची झडती घेण्यात आली. ज्यामध्ये पोलिसांना धक्काच बसला कारण यामध्ये त्यांना अनेक पाकिट मिळाली. कोलकाता बुक फेअरच्या ठिकाणी चोरी करून लक्ष वळवल्याप्रकरणी अभिनेत्री रूपा दत्ताला अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दत्ता यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांच्या वक्तव्यात अनेक विरोधाभास आढळून आले. तपासादरम्यान, अभिनेत्रीच्या पर्समधून अनेक पाकिटे आणि 75,000 रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
"केपमारी' (लोकांचं लक्ष भटकवून चोरी करण्याच्या) च्या आरोपाखाली रूपा दत्ताला अटक करण्यात आली आहे आणि या गुन्ह्यात आणखी काही लोक सामील आहेत, का याचा तपास सुरू आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.
अभिनेत्री यापूर्नी देखील आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली होती. तिने चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले होते. तिने सोशल मीडियावर अनुराग नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत केलेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रूपा दत्ताच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
चौकशीत धक्कादायक खुलासा
चौकशीदरम्यान रूपा दत्ताने सांगितले की, तिने अनेक गर्दीच्या ठिकाणी जसे की जत्रा आणि कार्यक्रमांना ती हजेरी लावते. या ठिकाणीही तिने यापूर्वीही अनेकांच्या पर्स चोरल्या आहेत.
रूपा दत्ताने टीव्ही सीरियल 'जय माँ वैष्णो देवी' मध्ये माता वैष्णो देवीची भूमिका साकारली आहे.