प्रशांत दामलेंकडून उपोषणाचा इशारा; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

 मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी सरसावले आहेत. 

Updated: May 17, 2024, 01:46 PM IST
प्रशांत दामलेंकडून उपोषणाचा इशारा; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या title=

मुंबई : मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्व्हिस लीगने 1992 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे. मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी पुढे आले आहेत. 

परळसारख्या मराठमोळ्या भागात असलेले दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाचे पडसाद उमटले. त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले आहे. 

नुकतंच प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ''दामोदर नाट्यगृह जमीनदोस्त होऊ नये, गिरणगावातील ही ऐतिहासिक वास्तू जपली जावी यासाठी गेले तीन-चार महिन्यांपासून सामोपचाराने प्रयत्न सुरू होते. विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नाट्यगृहाचे पाडकाम स्थगित करण्याची सूचना दिलेली असताना त्याला न जुमानता दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने नाट्यगृह पाडण्यास सुरुवात केली आहे.''

पुढे दामले म्हणाले, ''त्याच निषेध करण्यासाठी सहकारी मनोरंजन मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत, मराठी नाट्यनिर्माते आणि कलाकार यांनी एकत्र येऊन माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने नाट्यकर्मींची मातृसंस्था म्हणून नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला असल्याचे दामले यांनी सांगितलं. दामोदर नाट्यगृहाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सोशल सर्व्हिस लीगने नाट्यगृह पाडण्यास सुरुवात केलीच आहे. ''

पुढे दामले म्हणाले, ''त्यामुळे त्यांनी शाळा आणि नाट्यगृह दोन्हींचे बांधकाम एकाचवेळी सुरू करून पूर्णत्वास न्यावे, नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच साडेसातशे आसनांचं असावे, नाट्यगृह तळमजल्यावरच असावे, या बांधकामासाठी मिळणाऱ्या वाढीव चटईक्षेत्राचा उपयोग दोनशे आसनांचे आणखी एक छोटेखानी नाट्यगृह बांधण्यासाठी करावा, या नाट्यगृहातील सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय आणि तालमीची जागा त्यांना देण्यात यावी, नव्याने नाट्यगृह बांधल्यानंतर त्याची भाडेवाढ करू नये तसेच या नाट्यगृहाचे काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशा मागण्या प्रशांत दामले यांनी दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनापुढे ठेवल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन हवं'' असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले.