सिनेसाक्षर प्रेक्षक घडविणारी चळवळ म्हणजे 'प्रभात' - अमोल पालेकर

'प्रभात चित्र मंडळ' ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे, असं मत अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Updated: Jul 6, 2017, 05:52 PM IST
सिनेसाक्षर प्रेक्षक घडविणारी चळवळ म्हणजे 'प्रभात' - अमोल पालेकर  title=

मुंबई : 'प्रभात चित्र मंडळ' ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे, असं मत अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

'प्रभात'ला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत, षष्ठी महोत्सवाला प्रेक्षकात बसून जोरजोरात टाळ्या वाजवून आनंद साजरा करेन' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

५ जुलै १९६८ रोजी वसंत साठे, दिनकर गांगल आणि सुधीर नांदगांवकर आणि इतर सिने अभ्यासकांनी मिळून स्थापन केलेल्या प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ बुधवारी संपन्न झाला. यावेळी, प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या प्रेक्षागृहात ज्येष्ठ सिने-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या शुभहस्ते प्रभात चित्र मंडळाचे मुखपत्र असलेल्या 'वास्तव रुपवाणी' या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आलं.


'वास्तव रुपवाणी' प्रकाशित

यावेळी, अमोल पालेकर यांच्यासह मनमोहन शेट्टी, किरण शांताराम, सुधीर नांदगांवकर, दिनकर गांगल, धर्माधिकारी, संतोष पाठारे आदि मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी भारतातील तसेच मुंबईतील इतर फिल्म सोसायटींच्या तुलनेत प्रभात चित्र मंडळाचे कार्य अधोरेखित करताना सुवर्ण महोत्सवानिमित्त व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 
प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक शाम बेनेगल, गोविंद निहलानी, नीना कुलकर्णी, रवी जाधव, दिलीप करंबेळकर, मनमोहन शेट्टी आदी मान्यवरांची एक स्वागत समिती गठीत करण्यात आली. या समितीतील मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता कान्स चित्रपट महोत्सवात सर्वात्कृष्ट ठरलेल्या 'आय डॅनियल ब्लेक' या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने करण्यात आली.