Maharashtra News: पालकमंत्री पदाचा तिढा सुटला? पण 'या' एका जिल्ह्यामुळं महायुतीचा फॉर्म्युला बिघडणार

Guardian Minister Controversy: पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असल्याची चर्चा आहे. मात्र या एका जिल्ह्यामुळं महायुतीचं गणित बिघडणार असल्याची चर्चा आहे. 

Updated: Jan 7, 2025, 01:22 PM IST
 Maharashtra News: पालकमंत्री पदाचा तिढा सुटला? पण 'या' एका जिल्ह्यामुळं महायुतीचा फॉर्म्युला बिघडणार title=
Maharashtra News Senior leaders get chance to be guardian ministers in Mahayuti government

Maharashtra Government Guardian Minister Latest News: खातेवाटप आणि मंत्रिपदाचा तिढा सुटल्यानंतर पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता होती. मात्र लवकरच पालकमंत्रीपदाचा तिढादेखील सुटणार आहे.  पालकमंत्री म्हणून पूर्वीचे जिल्हेच कायम ठेवावे, असा आग्रह ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला होता, तो मान्य झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ज्येष्ठत्व तर काही ठिकाणी मागील काळातील पालकमंत्रिपदाचा अनुभव याचा देखील विचार केला जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. मात्र बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्यापही झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पालकमंत्री नियुक्तीवरून एकेका जिल्ह्यात तीन तीन जणांनी दावा सांगितला आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत व पुनर्वसन मंत्र मंत्री मकरंद पाटील हे देखील इच्छुक आहेत. ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी शंभूराजे देसाई यांनाच संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तर शिवसेनेकडून भरत गोगावले हे देखील इच्छुक आहेत. मात्र या ठिकाणी पुन्हा आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. जळगाव येथे सेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री महाजन यांच्या नावाची चर्चा होती. मात्र याठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव अंतिम असल्याचे सांगण्यात येत आहे

बीड जिल्ह्यातील सध्याचे वातावरण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर राज्यभर संतापाची लाट आहे. यातही मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, असा सर्वपक्षीयांनी आग्रह धरला आहे. त्यामुळेच बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बीडचे पालकमंत्री पद घ्यावे, असाही आग्रह धरण्यात येत आहे. 

दरम्यान, सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सागर बंगल्यांवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून या भेटीत पालकमंत्रीपदाबाबत अंतिम चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, बीड प्रकरणावरही चर्चा झाल्याची शक्यता.