Metro Project In Maharashtra: 'महाराष्ट्रातील मेट्रो मॅन' अशी इमेज असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राज्यातील विकासकामांना वेग येईल अशी जोरदार चर्चा आहे. असं असतानाच पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरामध्येच फडणवीसांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून कामांना वेग देण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे मेट्रोसाठी आग्रही असलेल्या फडणवीसांनी मेट्रो ही पर्यायी सेवा मुंबईसारख्या शहरामध्ये लवकरात लवकर अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी फडणवीस इच्छूक असल्याचं दिसत आहे. मुंबईमध्ये सध्या तरी लोकल ट्रेन आणि बेस्ट बस या दोनच प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध असून मेट्रो मार्गाचं प्रमाण या दोन्ही सेवांच्या तुलनेत फारच कमी आहे.
भारतामधील सर्वाधिक मोठं मेट्रो नेटवर्क दिल्ली शहरामध्ये आहे. नवी दिल्लीतील मेट्रो मार्गाची लांबी 351 किलोमीटरची असून यात अजून 65 किलोमीटरची भर पडत आहे. त्यामुळेच आता फडणवीसांनी पुढील पाच वर्षांमध्ये मुंबईत मेट्रोचं जाळं अधिक मजबूत करुन जास्तीत जास्त मार्गांवर सेवा सुरु करण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं आहे. यासाठी त्यांनी यंत्रणांना टार्गेटही दिलं आहे.
मुंबईमध्ये सध्या 59.19 किलोमीटरच्या मार्गांवर मेट्रो धावते. तर एकूण 143.65 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोची कामं सुरु आहेत. असं असतानाच फडणवीसांनी आता दरवर्षी महाराष्ट्रामध्ये किमान 50 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग बांधून झाले पाहिजेत अशा सूचना केल्या आहेत. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळेस त्यांनी मेट्रोसंदर्भातील अधिकाऱ्यांना आता मेट्रोच्या कामात अधिक उशीर होता कामा नये असं सांगितलं आहे. काम पूर्ण करण्यासाठी नवी मुदत घ्या पण दरवर्षी किमान 50 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन नागरिकांसाठी खुली करा, असं मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
मुंबईमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरु आहेत. अगदी पश्चिम उपनगरांपासून ते ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्येही मेट्रोची कामं सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नव्या सुचनेमुळे या मेट्रोच्या कामांना अधिक वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मेट्रो 2 बी - डीएन नगर ते मंडाले, 80 टक्के काम पूर्ण (23.6 किलोमीटर) झालं आहे.
मेट्रो 4 आणि 4 ए - वडाळा ते कासरवडवली आणि गायमुखपर्यंत, 80 टक्के काम पूर्ण झालं आहे.
मेट्रो 5 - ठाणे - भिवंडी - कल्याण, 95 टक्के काम पूर्ण (२४.९ किमी) झालं आहे.
मेट्रो 6 - स्वामी समर्थ नगर - विक्रोळी, 77 टक्के काम (15.5 किमी) पूर्ण झालं आहे.
मेट्रो 9 आणि 7 ए - दहिसर पूर्ण - मीरा-भाईंदर - अंधेरी पूर्व - सीएसएमआयए, 92 टक्के काम पूर्ण झालं आहे.
मेट्रो 10 - गायमुख ते शिवाजी चौक - मीरा रोड, मूळ मेट्रोचं एक्सटेंन्शन असलेल्या गायमुख स्थानकापासून ठाण्याला मीरा रोडशी जोडणाऱ्या या मेट्रो मार्गावरील काम अद्याप सुरू झालेलं नाही.
मेट्रो 12 - कल्याण ते तळोजा, काम हाती घेण्यात आलं आहे.