आसाममध्ये 300 फूट खोल कोळसा खाणीत पाण्याचा शिरकाव; मजूर अडकल्यानं चिंता वाढली, कसं सुरुय बचावकार्य?

Assam Coal Mine News : मोठं संकट... आसममधील कोळसा खाणीत अचानक पाण्याचा शिरकाव... बाहेर यायच्या वाटा बंद.. आता पुढे काय?   

सायली पाटील | Updated: Jan 7, 2025, 08:30 AM IST
आसाममध्ये 300 फूट खोल कोळसा खाणीत पाण्याचा शिरकाव; मजूर अडकल्यानं चिंता वाढली, कसं सुरुय बचावकार्य?  title=

Assam Coal Mine News : आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यामध्ये सध्या एक मोठी दुर्घटना घडली असून, संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेनं वेधलं आहे. इथं जवळपास 300 फूट खोल कोळसा खाणीमध्ये एकाएकी पाणी शिरल्यानं मोठं संकट ओढावलं आहे. खाणीमध्ये 9 मजूर अडकले असल्यानं आता वेगळीच चिंता व्यक्त केली जात आहे. 

मेघालयच्या सीमेनजीक असणारी ही खाण अवैध असून, उमरंगसो शहरानजीक ती असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, अचानकच या खाणीत पाण्याचा शिरकाव झाला आणि हे संकट आणखी गंभीर झालं. सदर घटनेची माहिती मिळताच इथं बचावकार्याची पथकं पाचरण करण्यात आली. पण, या खाणीची वाट उंदराच्या बिळाइतकी लहान असल्यानं आता बचावकार्यात कैक अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार खाणीमध्ये आतापर्यंत 100 फूट अंतरावर पाणी भरलं आहे, ज्यामुळं संकट आणखी गंभीर होतना दिसतंय. इथं बचावकार्यासाठी भारतीय सेना, राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळ, एनडीआरएफ यांची विशेष पथकंही दाखल झाली आहेत. सर्व पथकांनी इथं संयुक्त कारवाई सुरू करत बचावकार्याला वेग दिला असला तरीही पाणी बऱ्याच उंचीपर्यंत साठल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ही वस्तूस्थिती. 

हेसुद्धा वाचा : कोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company चा मालक फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या विनंतीनंतर इथं लष्कराचं विशेष पथकही बचावकार्यासाठी दाखल झालं. या पथकामध्ये गोताखोर, इंजिनिअर, लष्करातील प्रशिक्षित जवान यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. लष्कराशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार या बचावमोहिमेचं नेतृत्त्वं वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाअंतर्गत सुरू आहे. 

खाणीत अडकलेल्या मजुरांची नावं खालीलप्रमाणे... 

दरम्यान, यापूर्वीही या भागात अशा काही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. डिसेंबर 2018 मध्ये मेघालच्या पूर्वेकडे असणाऱ्या जयंतिया हिल्स इथंही अशीच घटना घडली होती. जिथं कोळसा खाणीत नदीचं पाणी शिरल्यानं मोठं संकट ओढावलं होतं. 2021 मध्ये याच भागात डायनामाईटच्या स्फोटामुळं खाणीत पाणी भरल्यानं पाच मजुर तिथं अडकले होते.