सर्वांनाच विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, शाह यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर बॉलिवू़डमध्ये दोन गट

गोहत्या मुद्द्याला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येहून जास्त महत्त्वं दिलं जात आहे, असं ते म्हणाले होते. 

Updated: Dec 24, 2018, 08:18 AM IST
सर्वांनाच  विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, शाह यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर बॉलिवू़डमध्ये दोन गट  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला गेला. सोशल मीडियापासून ते कलाविश्वापर्यंत याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. ज्यात कोणी शाह यांचा विरोध केला, तर कोणी त्यांना पाठिंबा दिला. 

चित्रपट  दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी या सर्व प्रकरणावर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत, भारत एक लोकशाही राष्ट्र असल्याचा संदर्भ येथे जोडला. 'इथे प्रत्येकालाच त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. कारण भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. मुख्य म्हणजे भारतात कोणालाही कोणत्याही प्रकारचं भय आहे, असं मला वाटत नाही. इथे सर्वांनाच समान वागणूक मिळते', असं म्हणत शाह यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक विचार होते असं भांडारकर यांनी स्पष्ट केलं. 

एकिकडे भांडारकर यांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे अभिनेते आशुतोष राणा यांनी  मात्र शाह यांच्या वक्तव्यावर व्यक्त होण्यापेक्षा त्यावर विचार केला गेला पाहिजे असं म्हणत त्यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. 

प्रत्येकालाच आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर, मित्रपरिवारासमोर कोणतीही भीती न बाळगता त्यांचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण, त्या गोष्टींवर व्यक्त होताना, कोणीतीह कृती करताना आपण मात्र सावध राहणं गरजेचं आहे. जर कोणीही त्यांचे विचार मांडत असेल तर ते फक्त ऐकून न घेता त्यावर विचारही केला जाणं तितकच महत्त्वाचं आहे', असं राणा म्हणाले. स्वातंत्र्य म्हणजे साधेपणा आणि सभ्यपणा ही बाब त्यांनी अधोरेखित करत हीच आपली संस्कृती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शाह यांच्या वक्तव्यानंतर आता येणाऱ्या या सर्व प्रतिक्रिया पाहता बऱ्याच चर्चांनी डोकं वर काढलं आहे. इतकच नव्हे तर कलाविश्वातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये शाह यांनी गोहत्या मुद्द्याला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येहून जास्त महत्त्वं दिलं जात आहे, असं म्हणत उद्या जमावाने माझ्या मुलांना ते हिंदू आहे ती मुस्लिम असं विचारल्यास त्यांच्याकडे काहीच उत्तर नसेल, असं ते म्हणाले. आपल्याला आपल्या मुलांची चिंता सतावत असून, ही परिस्थिती बदलत नसल्यामुळेच असं होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ज्यानंतर हाच मुद्दा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.