शिख समुदायाबाबतचं वक्तव्य भोवणार! कंगना रानौतविरुद्द FIR दाखल

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगना रानौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत

Updated: Nov 23, 2021, 08:36 PM IST
शिख समुदायाबाबतचं वक्तव्य भोवणार! कंगना रानौतविरुद्द FIR दाखल title=

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगना रानौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना रानौतविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा समितीने खार पोलिस स्टेशनमध्ये कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कंगना रानौतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर अभिनेत्री कंगना रानौत विरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. कंगना रानौतने शीख समुदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

इंस्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने लोक आक्रमक झाले आहेत. शीख समुदायाने कंगनाच्या मुंबईतील खार इथल्या घरासमोर निदर्शनेही केली.

कंगनाची वादग्रस्त पोस्ट
सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर अभिनेत्री कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तीने म्हटलं होतं, खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण हे विसरता कामा नये, एका महिला पंतप्रधानाने या खलिस्तानींना चिरडलं होतं. 

तसंच इंदिरा गांधी यांचा एक फोटो शेअर करत कंगनाने लिहिलं होतं, इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवची पर्वा न करता त्यांना डासांसारखं चिरडलं, पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूच्या अनेक दशकानंतरही आजही ते त्यांच्या नावाने थरथर कापतात, त्यांना असाच गुरु पाहिजे, असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.