म्हणून श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम करायला दिला नकार

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 25, 2018, 07:25 PM IST
म्हणून श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम करायला दिला नकार

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. ५४ व्या वर्षी श्रीदेवीनं अखेरचा श्वास घेतला. १९६३ साली जन्म झालेल्या श्रीदेवीनं १९६७मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. श्रीदेवीनं हिंदीबरोबरच तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्ल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २०१२ साली तिनं इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून कमबॅक केलं. २०१३ साली श्रीदेवीला पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

१५ वर्षांच्या ब्रेकनंतर कमबॅक

१९९७ साली आलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवीनं १५ वर्ष ब्रेक घेतला. २०१२ साली इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून तिनं कमबॅक केलं आणि पुन्हा स्वत:ला सुपरस्टार म्हणून सिद्ध केलं. २०१७ साली आलेला मॉम हा तिचा चित्रपटही यशस्वी ठरला. मॉम हा श्रीदेवींचा ३००वा चित्रपट होता.

अनिल कपूरसोबत काम करायला नकार

श्रीदेवीनं मिस्टर इंडिया, सदमा, चालबाज, चांदनी यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. अनिल कपूर आणि श्रीदेवी या जोडीनं काही काळ बॉलीवूडमध्ये राज्य गाजवलं होतं. या दोघांचे लम्हे, लाडला आणि जुदाई हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. पण एक वेळ अशी आली जेव्हा श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम करायला नकार दिला. श्रीदेवीनं अनिल कपूरचा भाऊ असलेल्या बोनी कपूरशी लग्न केलं.

आणि माधुरी सुपरस्टार झाली

श्रीदेवीला बेटा या चित्रपटासाठी ऑफर आली होती. पण तेव्हा श्रीदेवीनं ही ऑफर धुडकावली. याआधी श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम केलं होतं. एकसारखं अनिल कपूरबरोबर काम करण्याची श्रीदेवीची इच्छा नसल्यामुळे तिनं या भूमिकेला नकार दिला. अखेर श्रीदेवीऐवजी माधुरी दीक्षितची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. या चित्रपटामुळे माधुरीला दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळख मिळण्यास मदत झाली. याच चित्रपटातून माधुरीला धक धक गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.