मुंबई : रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय' १४ फ्रेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'गली बॉय'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. 'गली बॉय' चित्रपटात रणवीर, आलियाच्या अभिनयासह चित्रपटाच्या कथेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'गली बॉय'ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही जवळपास १३ ते १४ करोडचा गल्ला जमवला आहे.
जोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ला चित्रपट समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. रणवीर सिंहचा 'गली बॉय' हा सर्वात मोठा ओपनिंग करणारा दूसरा चित्रपट ठरला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहच्या 'पद्मावत'नंतर 'सिंबा'ने २०.७२ करोड ओपनिंग केली होती. त्यानंतर आलेल्या 'गली बॉय'ने पहिल्या दिवशी १९.४० करोड रूपये कमाई करत ओपनिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर 'पद्मावत' तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'गली बॉय'ने प्रदर्शनापूर्वीच चांगली कमाई करण्यास सुरूवात केली होती. चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींगमध्येच आठ करोड कमावले होते. भारतात 3350 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला 'गली बॉय' या आठवड्यातील प्रदर्शित होणारा एकमेव चित्रपट आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विकेंन्डमध्ये 'गली बॉय' काय कमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईतील स्लम भागात राहणाऱ्या एका सामान्य मुलाचा रॅपर बनण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास 'गली बॉय'मध्ये दाखवण्यात आला आहे. चित्रपटात जोया अख्तरने मांडलेल्या कथेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, कल्की, विजय राजसह इतरही कलाकारांनी अतिशय उत्तम भूमिका साकारल्या आहेत.