मुंबई : बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराच्या वाट्याला यश हे अगदी सहजासहजी आलं आहे, असं फार क्वचितच घडलं असेल. आपआपल्या क्षेत्रांमध्ये नावारुपास येणाऱ्या प्रत्येकाच्याच संघर्षाची गाथा ही वेगळी, रंजक आणि तितकीच प्रेरणादायीही असते. अशीच कहाणी आहे, 'गुत्थी' फेम अभिनेता सुनील ग्रोव्हर याची.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी संवाद साधताना सुनीलने कलाविश्वातील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांवरून पडदा उचलला. सुरुवातीपासूनच अभिनाकडे त्याचा खास कल होता. अभिनयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सुनील मायानगरी मुंबईत आला. पण, इथे आल्यावर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की, या शहरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा कोण्या एका ठिकाणचा 'सुपरस्टार' असतो. पण, त्याला वास्तवाचा सामना मात्र इथेच करावा लागतो.
स्वप्नांचा पाठलाग करत या झगमगणाऱ्या शहरात आल्यानंतर सुरुवातीचं एक वर्ष कुटुंबाकडून मिळालेले पैसे आणि काही साठवणीतच्या पैशांच्या बळावर फक्त मजा करण्याचं त्याचं सत्र सुरू होतं. दिवस पुढे गेले, तसतशी त्याला पैशांची चणचण भासू लागली. महिन्याला अवघे पाचशे रुपयेच तो कमवत होता. पण, आपण लवकरच यशस्वी होणार असल्याचीही त्याला आशा होती.
'हाताशी पैसे नाही, असं लक्षात आलं तेव्हाच वास्तवाची जाणिव त्याला होऊ लागली होती. सारा उत्साह आणि प्रेरणा ओसरली होती. पण, वडिलांनी संधी असतानाही रेडिओ अनाऊंसर होण्याची संधी फक्त कुटुंबाच्या विरोधामुळे मनाविरुद्ध बँकेत नोकरी केली. आपल्याला स्वप्नं अशीच विरळ होऊ द्यायची नाहीत, हे त्याने ठरवलं होतं. त्यामुळे मी कामं स्वीकारण्यास सुरुवात केली', असं सुनील म्हणाला.
सुनीलला काम मिळालं, संधीही मिळाली पण ही वाट त्याच्यासाठी सोपी नव्हती. काही कारणाने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली. पण, तेव्हा दुसरं काम त्याच्या हाती आलं. पुढे जाऊन 'गुत्थी' हे पात्र साकारण्याची संधी त्याला मिळाली.
'गुत्थी'नेच खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. पाहता पाहता, हे नाव घराघरात पोहोचलं. याविषयीचीच आठवण सांगत आपण एकदा लाईव्ह कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर असताना प्रेक्षक आपल्याच नावाने ओरडत होते, त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता... हे सारं भारावून टाकणारं होतं, असं सुनीलने न विसरता सांगितलं. कारकिर्दीमध्ये यशाच्या या टप्प्यावर आलेलं असतानाही आपल्यात दडलेला आजूबाजूच्या व्यक्तींना कायम आनंदात ठेवण्याच्या प्रयत्नांत असणारा, अपयशाने न खचणारा लहान मुलगा मात्र अजून बऱ्याच दूरच्या प्रवासाचा वाटाड्या आहे.... आणि त्याचा हा प्रवास असाच सुरु राहील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.