Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ?

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 18, 2017, 12:54 PM IST
Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ? title=

मुंबई : शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता.

जे आता पाकिस्तानात आहे. ते सिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होते. खूप कमी वयातच गुलजार हे कविता करायला लागले होते. मात्र त्यांच्या वडीलांना हे पसंत नव्हतं. तरीही त्यांनी कविता करणे सोडले नाही आणि आज त्याच कवितांमुळे गुलजार बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. 

गुलजार यांनी आतापर्यंत २० वेळा फिल्मफेअर आणि पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१० मध्ये त्यांनी ‘स्मलडॉग मिलेनिअर’ सिनेमासाठी लिहिलेल्या ‘जय हो’ गाण्याला ग्रमी पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांना २०१३ मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. चला जाणून घेऊया गुलजार यांच्याबद्दल आणखी काही खास गोष्टी...!

१) गुलजार हे त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच स्वच्छ शुभ्र कपडे परिधान करतात. 

२) त्यांनी सुरूवातीला बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम केलं होतं. तर त्यांनी एस.डी.बर्मन यांच्या ‘बंदिनी’ मधून त्यांनी गीतकार म्हणून करिअरला सुरूवात केली. त्यांचं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग’ हे आहे. 
 
३) दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचा पहिला सिनेमा ‘मेरे अपने’(१९७१) हा होता. हा एका बंगाली सिनेमाचा रिमेक होता. 

४) गुलजार यांच्या जास्तीत जास्त सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक बघायला मिळतो. यावर त्यांचं मत आहे की, भूतकाळ दाखवल्याशिवाय सिनेमा पूर्ण होत नाही. याची झलक ‘किताब’, ‘आंधी’ आणि ‘इजाजत’ यांसारख्या सिनेमात बघायला मिळाली. 

५) गुलजार यांना ऊर्दू लिहिणे पसंत आहे. 

६) गुलजार हे १९७३ मध्ये आलेल्या ‘कोशिश’ सिनेमासाठी साइन लॅंग्वेज शिकले होते. कारण हा सिनेमा मूक-बधिर विषयावर होता. यात संजीव कुमार आणि जया भादुरी मुख्य भूमिकेत होते. 

७) १९७१ मध्ये त्यांनी ‘गुड्डी’ सिनेमासाठी लिहिलेलं ‘हमको मन की शक्ती देना’ हे गाणं इतकं हिट झालं की, नंतर ते शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायलं जाऊ लागलं. 

८) त्यांनी त्यांचा ‘हू तू तू’ सिनेमा फ्लॉप झाल्यावर सिनेमे करणं बंद केलं. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांनी शायरी आणि कथांकडे लक्ष केंद्रीत केलं.

९) गुलजार यांना टेनिस खेळणं खूप पसंत आहे. ते रोज सकाळी न विसरता टेनिस खेळतात. 

१०) टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, तेव्हाची लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांच्याशी त्यांचे प्रेम संबंध असल्याचे चर्चा रंगली होती. यादरम्यानच त्यांची भेट राखी यांच्याशी एका पार्टीत झाली होती.