Heeramandi Nath Utrai : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पाहता पाहता याच सीरिजमधील प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीच्या चर्चांना उधाण आलं. कलाकारांच्या उर्दूवरील प्रभुत्वापासून ते अगदी त्यांचा अभिनय आणि खरीखुरी हीरामंडी नेमकी कुठंय इथपर्यंतच्या चर्चांनी आणि कुतूहलपूर्ण प्रश्नांनी यामुळं जोर धरला. याच कलाकृतीमध्ये काही शब्दांचा उल्लेख जाणीवपूर्वक आणि सातत्यानं होताना दिसला. त्यातीलच एक शब्द म्हणजे, 'नथ उतराई'.
मुळात तवायफ या शब्दासंदर्भातील पुरेशी माहिती नसल्यामुळं काहींनी या संकल्पनेकडे चुकीच्या नजरेतून पाहिलं. पण, या त्याच महिला आहेत, ज्यांच्याकडे राजे - महाराजे त्यांच्या मुलांना संस्कारवर्गांसाठी पाठवच असत. तवायफ महिलांकडे जाणं एकेकाळच्या राजे-रडवाड्यांचा छंद असत. मुळात तरुण वयात आल्यानंतर मुलीला तवायफ होण्यासाठी काही चालीरितींचं पालन करावं लागत होतं. त्यातल्या काही परंपरा होत्या, नथ उतराई, मिस्सी आणि अंगिया.
नथ उतराई- उपलब्ध माहितीनुसार तवायफच्या कोठ्यावर कोणत्याही तरुणीची पहिली रात्र म्हणजे नथ उतराई. त्या काळात कुंटणखान्यामध्ये कायमच अविवाहित तरुणींसाठी जास्त पैसा मोजला जात असे. ऐन तारुण्यात असणाऱ्या मुलीवर पहिली बोली लागण्याचा क्षण कुंटणखान्यासाठी एक सोहळा असे. त्या दिवशी अनेक धनाढ्य लोक, नवाब इथं येऊन मुलीवर पैशांची बोली लावत असत. ज्याची बोली सर्वात जास्त, त्या व्यक्तीला, त्या धनिकाला मुलीसोबत पहिल्या रात्री वेळ व्यतीत करण्याची संधी मिळत असे. या क्षणी बोली लागलेल्या त्या मुलीच्या नाकात एक नथ घातली जात असे, त्या रात्रीनंतर मुलगी ती नथ कधीच घालत नसे.
मिस्सी- हीसुद्धा अशीच एक परंपरा, जिथं तरुणीचे दात काळे केले जात असत. त्या काळात काळे दात आणि कात खाऊन लाल झालेले ओठ सौंदर्याचं प्रतीक समजले जात असत. याच कारणास्तव तरुणीचे दात काळे केले जात आणि या प्रक्रियेला मिस्सी म्हणत. कुंटणखान्याती महिलांनाच या प्रथेमध्ये सहभागी होण्याची परवानगी असे.
अंगिया- एखादी मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होतात. याचदरम्यान तवायफ महिलांमध्ये अंगिया नावाची प्रथा पार पडते. या क्षणी अनेक तवायफ महिला एकत्र येऊन त्या महिलेला अंतर्वस्त्रे दिली जातात. तवायफ होण्याच्या वाटेवर त्या तरुणीचं हे पहिलं पाऊल असतं.