आता मोबाईल वापरासंदर्भात एक महत्त्वाची बातमी.. खरंतर आजकाल अशी वेळ आलीय. की आपण एक दिवस न जेवता राहू शकतो. पण मोबाईल हातात न घेता आपल्याला अर्धा दिवसही राहावणार नाही. याच मोबाईलचं व्यसन लहान मुलांमध्येही बघायला मिळतंय. आणि म्हणून पुण्यातल्या एका समाजानं अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतलाय. पाहुयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट.
अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल.. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेत.. अगदी लहान मुलंही मोबाईलच्या व्यसनातून सुटलेली नाहीत. या मुलांकडून जेवताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, अगदी झोपतानाही मोबाईलचा वापर होतो. यामुळं ना मुलांना बाहेर जाऊन खेळण्यात रस राहिलाय.. ना पुस्तक हातात घेऊन शिकण्यात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन पुढच्या पिढीला नीट वळण लावण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी 15 वर्षाखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका, असं फर्मान काढलंय. त्यांनी मुंबईत झालेल्या व्याख्यानात यासंदर्भात सूचना दिल्या.
बोहरा धर्मगुरुंची ही माहिती पालकांनी आपल्य़ा मुलांना सांगितली. याचा परिणाम पुण्यात बोहरी आळीत दिसूही लागलाय.
मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांच्या डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोच. पण पुढे जाऊन मुलांच्या मानसिक जडणघडणीवरही दुष्परिणाम होतोय.. याबाबत अनेक सर्वेक्षणं आणि अभ्यासही झालेत. 15 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करायचं असेल तर त्यांना मोबाईलपासून लांब ठेवणं अत्यावश्यक असल्याचं मानसोपचार तज्ज्ञही सांगतात.
मोबाईल, इंटरनेट हे माणसांच्या सोईसाठी आणि आयुष्य सोपं करण्यासाठी म्हणून जन्माला आले. मात्र याच मोबाईलनं आपल्या संपूर्ण आयुष्यावर आता ताबा मिळवलाय. अगदी आजी आजोबांपासून रांगणाऱ्या बाळापर्यंत सगळ्यांना मोबाईलनं खिळवून ठेवलंय. मात्र हाच मोबाईल आज अनेक शारीरिक, मानसिक आजारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निमंत्रण देतोय.. हेच ओळखून आता ऑस्ट्रेलिया, स्विडनसारख्या प्रगत देशांनीही मोबाईल वापराबाबत काही नियम आखून दिलेत. त्यामुळं बोहरा समाजाच्या निर्णयाचं अनुकरण सर्वच मुलांच्या भविष्यासाठी फायद्याचं ठरेल.